नेहमी सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उत्तर कोरियाने आता रेल्वेमधून क्षेपणास्त्र चाचणी करत जगाला धक्का दिला आहे. ८०० किलोमीटर पेक्षा जास्त पल्ला असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. रेल्वेतून क्षेपणास्त्र वाहून नेत आणि ते यशस्वीपणे डागत उत्तर कोरियाने जगाला क्षमता दाखवून दिली आहे. क्षेपणास्त्र चाचणीचे एक छायाचित्र उत्तर कोरियाने प्रसिद्ध केलं आहे. डागलेले क्षेपणास्त्र हे ८०० किलोमीटर अंतर पार करत जपान जवळच्या समुद्रात कोसळले.

रेल्वेतून क्षेपणास्त्र वाहून नेण्यामुळे क्षेपणास्त्राचा ठाव ठिकाण समजणे अवघड जाते, विशेषतः उपग्रहापासून – ड्रोनपासूनही ते लपवता येते. रेल्वेमुळे क्षेपणास्त्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद आणि सुरक्षित नेता येते. रेल्वेतून क्षेपणास्त्र डागण्याची यशस्वी चाचणी घेतल्याने उत्तर कोरियाच्या मारक क्षमतेत एक महत्त्वाची भर पडली आहे.

याआधीच गेले अनेक महिने उत्तर कोरिया विविध पल्ल्यांची मारक क्षमता असलेल्या विविध क्षेपणास्त्रांची चाचणी करत आला आहे. नुकतंच क्रुझ क्षेपणास्त्राची चाचणी करत स्वतःची मारक क्षमता जगाला दाखवून दिली आहे. मात्र अशा चाचण्यांमुळे त्या भागातील शांततेचा भंग होत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. रेल्वेतून केलेल्या ताज्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे दक्षिण कोरिया आणि जपानच्या चिंतेत भर पडली आहे.