उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राची पाणबुडीतून प्रक्षेपण करीत चाचणी केली आहे. अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्यात लष्करी कवायती सुरू असल्याने उत्तर कोरिया संतप्त असून, त्याने अणुहल्ला करण्याचा इशारा दिला आहे. दक्षिण कोरियाच्या निवेदनात म्हटले आहे, की पहाटे ५.५० वाजता क्षेपणास्त्र पूर्व सागर म्हणजे जपानी सागरातील पाणबुडीवरून सोडण्यात आले.

या निवेदनाने आणखी सविस्तर माहिती दिलेली नसून, ती चाचणी यशस्वी झाली की अपयशी ठरली याची कल्पना त्यातून येत नाही. दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया यांच्यात सीमेवर तणाव वाढला आहे. उलची फ्रीडम लष्करी कवायती अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्यात सुरू असून, त्यामुळे उत्तर कोरियाचा संताप शिगेला पोहोचला आहे.

दक्षिण कोरिया व अमेरिका यांनी त्यांच्या संयुक्त लष्करी कवायती निव्वळ संरक्षण स्वरूपाच्या असल्याचे म्हटले आहे, पण उत्तर कोरियाने मात्र मुद्दाम कवायतींचे प्रक्षोभक कृत्य केले जात असल्याचे म्हटले आहे. उत्तर कोरियाने सोमवारी संयुक्त लष्क री कवायतींचा निषेध केला होता.

या कवायती म्हणजे आमच्या सार्वभौमत्वाचा भंग असून, त्यातून आम्ही बचावात्मक पवित्रा म्हणून अणुहल्ले करू असे उत्तर कोरियाने म्हटले होते. उलची फ्रीडम कवायती दोन आठवडे चालणार असून, त्यात उत्तर कोरियाने अणुहल्ला केला तर काय करायचे, याची तालीम संगणक सादृश्यीकरणाने केली जाणार आहे. या कवायतींमध्ये ५० हजार कोरियन व २५ हजार अमेरिकी सैनिक सहभागी आहेत.

कोरियन द्वीपकल्पात त्यामुळे तणाव वाढला आहे. दक्षिण कोरियाच्या अध्यक्ष पार्क गेन हाय यांनी सांगितले, की उत्तर कोरियाचे काही लोक फुटले आहेत. त्यामुळे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या राजवटीला फटका बसला आहे. उत्तर कोरियाकडून आमच्या देशात दहशतवादी हल्ले केले जाऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.