आपल्या नेतृत्वाने ठरवल्यानुसार ‘कुठल्याही वेळी आणि कुठल्याही ठिकाणी’ अण्वस्त्र चाचणी करण्यात येईल, असा इशारा उत्तर कोरियाने सोमवारी दिला. यामुळे या भागातील अस्वस्थतेत आणखी भर पडली आहे.

एकीकडे उत्तर कोरिया लांबपल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची किंवा सहाव्या अणुचाचणीची तयारी करत असल्याची चिन्हे असतानाच, असे झाल्यास लष्करी हल्ला करण्याची शक्यता नाकारण्यास अमेरिकेने नकार दिल्याने गेल्या काही आठवडय़ांपासून कोरियन द्वीपकल्पातील तणाव प्रचंड वाढला आहे.

अमेरिकेने कुठलाही पर्याय स्वीकारल्यास त्याचे प्रत्युत्तर देण्यास उत्तर कोरिया पूर्णपणे तयार असल्याचे देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. वॉशिंग्टनने त्याची शत्रुत्वाची धोरणे रद्द केली नाहीत, तर आपली आण्विक हल्ल्याची क्षमता वाढवणे देशाची राजवट सुरूच ठेवेल असे त्याने म्हटल्याचे वृत्त केसीएनए या सरकारी वृत्तसंस्थेने दिले.

उत्तर कोरियाने गेल्या ११ वर्षांत पाच अणुचाचण्या केल्या असून, अमेरिकेपर्यंत पोहचू शकेल असे क्षेपणास्त्र तयार करण्याच्या त्याच्या स्वप्नाची पूर्तता करण्यात त्याने बरीच प्रगती केली असल्याचे मानले जाते.

अमेरिका व दक्षिण कोरिया यांनी दरवर्षी संयुक्त लष्करी कवायती केल्या की ही आक्रमणाची तयारी असल्याचे सांगून उत्तर कोरिया त्याचा निषेध करते. मात्र यावेळी दोन्ही बाजूंनी अनेकदा धमक्यांचे सत्र झाल्याने कधीही संघर्ष उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संयुक्त कवायती नुकत्याच संपल्या असल्या, तरी जपानी समुद्रात दोन्ही देशांच्या संयुक्त नौदल कवायती सध्या सुरू आहेत.

उत्तर कोरियाला त्याचा शस्त्रविषयक कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अधिक प्रयत्न करावे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी म्हटल्यानंतर काही तासांतच त्या देशाने शनिवारी एक अयशस्वी क्षेपणास्त्र चाचणी पार पाडली होती.