सीमेवरील विरोधी प्रचारामुळे संताप; हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीनंतर तणाव
उत्तर कोरियाच्या संभाव्य चौथ्या अणुचाचणीचे प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने तणावग्रस्त सीमेवर त्यांच्याविरुद्धची प्रचार मोहीम सुरूच ठेवल्यामुळे चिडलेल्या उत्तर कोरियाने त्या देशाला युद्धाचा इशारा दिला आहे.
उत्तर कोरियाविरुद्धची प्रचार मोहीम हिंसक धमक्यांनी युक्त तर आहेच, मात्र त्यांच्या हुकूमशाही नेतृत्वावरील टीकेबाबत तो देश अतिशय संवेदनशील आहे. सेऊलने गेल्या पाच महिन्यांत शुक्रवारी प्रथमच सीमेपलीकडे पुन्हा हा प्रचार सुरू केला.
हा विरोधी प्रचार जवळजवळ युद्धासारखाच असल्याचे प्याँगयांगचे म्हणणे आहे. ११ वर्षांच्या खंडानंतर गेल्या ऑगस्टमध्ये दक्षिण कोरियाने ही प्रचार मोहीम पुन्हा सुरू केली, त्या वेळी दोन्ही देशांनी एकमेकांवर तोफगोळे डागले होते, याची उत्तर कोरियाने आठवण करून दिली आहे.
एकीकडे अणुबॉम्बचा मारा करण्याची क्षमता असलेल्या अमेरिकेच्या प्रगत युद्धनौका दक्षिण सागरात तैनात करण्याच्या शक्यतेबाबत वॉशिंग्टन व सेऊल यांच्यात चर्चा होत असतानाच सुरू झालेल्या या विरोधी प्रचारामुळे कोरियन द्वीपकल्पाला युद्धाच्या उंबरठय़ावर नेऊन ठेवले आहे, असे प्याँगयांगमधील किम सुंग चौकात जमलेल्या मोठय़ा जमावासमोर बोलताना सत्तारूढ पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वीरीत्या चाचणी केल्यामुळे आमचे शत्रू आमचा मत्सर करत आहेत, असे कामगार पक्षाचे सचिव किम की नाम यांनी शुक्रवारी रात्री सरकारी दूरचित्रवाहिनीवर केलेल्या भाषणात सांगितले.दोन्ही देशांदरम्यानच्या सीमेवर ज्या सुमारे १० ठिकाणी शुक्रवारपासून भोंग्यांवरून प्रचार मोहीम सुरू झाली आहे, त्या ठिकाणी तैनात दक्षिण कोरियाच्या फौजांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र सीमेपलीकडून उत्तर कोरियाच्या लष्कराची कुठलीही असाधारण हालचाल त्यांना अद्याप दिसलेली नाही, असे सेऊलच्या संरक्षण मंत्रालयाचा एक अधिकारी म्हणाला.
सीमेजवळ क्षेपणास्त्रे
उत्तर कोरियाकडून होणाऱ्या संभाव्य चिथावणीचा सामना करण्यासाठी दक्षिण कोरियाने सीमेजवळ क्षेपणास्त्रे, तोफखाना आणि इतर शस्त्र यंत्रणा तैनात केल्या असल्याचे वृत्त सेऊलच्या ‘योनहाप’ या वृत्तसंस्थेने दिले, मात्र मंत्रालयाने याला दुजोरा दिलेला नाही.