20 October 2019

News Flash

ट्रम्प-किम चर्चेच्या अपयशावर आता रशियात खलबते

अमेरिकेबरोबर अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या संदर्भात सुरू असलेल्या पेचप्रसंगात रशियाचा पाठिंबा मागितला आहे

| April 25, 2019 02:40 am

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन

व्लादिवोस्तोक : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबरच्या शिखर बैठकीसाठी व्लादिवोस्तोक येथे दाखल झाले आहेत. पुतिन यांच्यासमवेत त्यांची पहिलीच शिखर बैठक होत असून बुधवारी त्यांचे येथे आगमन झाले.

उत्तर कोरियाने अमेरिकेबरोबर अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या संदर्भात सुरू असलेल्या पेचप्रसंगात रशियाचा पाठिंबा मागितला आहे. ही शिखर बैठक गुप्तपणे आयोजित करण्यात आली होती, पण अखेरच्या क्षणी त्याबाबत घोषणा करण्यात आली. पुतिन यांच्यासमवेत किम यांची ही पहिलीच बैठक असून त्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत हनोई येथे फेब्रुवारीत झालेल्या बैठकीतील वाटाघाटी व त्यातील अपयशाची कारणे याबाबत चर्चा करणार आहेत. किम यांची चिलखती रेल्वे दुपारी झारच्या काळातील व्हादिवोस्तोक रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. नंतर किम यांचे शाही स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली. आपली ही भेट यशस्वी होईल अशी आशा किम यांनी रशियन दूरचित्रवाणीशी बोलताना व्यक्त केली. त्यांची रेल्वे रशियाची हद्द ओलांडून खासान शहरात प्रवेश करीत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. कोरियन द्वीपकल्पातील प्रश्न सोडवण्यासाठी व द्विपक्षीय संबंधाबाबत आपण ठोस चर्चा करू शकू, असा विश्वास  त्यांनी व्यक्त  केला. पुतिन हे व्लादिवोस्तोक येथे गुरूवारी येणार असून नंतर बीजिंग येथील दुसऱ्या शिखर बैठकीसाठी रवाना होणार आहेत.

उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे,की किम हे रेल्वेने रवाना झाले असून त्यांची गाडी खासान शहर ओलांडून  गेली आहे. तेथे पारंपरिक वेशातील महिलांनी त्यांचे मीठ-भाकरी ओ़वाळून टाकीत स्वागत केले. किम यांचे पूर्वसुरीही (त्यांचे वडील व आजोबा) रशियाला जाताना याच ठिकाणी थांबले होते. खासान रेल्वे स्टेशनची इमारत ही लाकडी असून त्याला किम २ सुंग यांचे नाव दिलेले आहे. रशिया व उत्तर कोरिया यांच्या मैत्रीचे ते प्रतीक मानले जाते. तेथे खांबांवर रशिया व उत्तर कोरियाचे ध्वज लावण्यात आले होते. मंगळवारी व्लादिवोस्तोक येथे विद्यापीठ आवारात शिखर बैठक होणार आहे. किम हे शुक्रवारीही व्लादिवोस्तोक येथे मुक्काम करणार असून त्या वेळी ते बॅले कार्यक्रमास उपस्थित राहून मत्स्यालय पाहण्यासाठी जाणार आहेत.

पुतिन यांनी किम यांना अनेक वेळा निमंत्रण दिले होते, त्यानंतर आता ही भेट होत आहे. मार्च २०१८ पासून किम यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासमवेत चार, तर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांच्यासमवेत तीन, तर ट्रम्प याच्यासमवेत दोन व व्हिएतनाम अध्यक्षांबरोबर एक शिखर बैठक घेतली आहे.

First Published on April 25, 2019 2:38 am

Web Title: north korean leader kim jong un arrives in vladivostok ahead of first meeting with putin