आंतर-कोरियाई परिषदेत सहभागी होण्यासाठी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन दक्षिण कोरियात दाखल झाला आहे. 1953 नंतर उत्तर कोरियाची सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये जाणारा किम जोंग उन पहिला उत्तर कोरियन नेता ठरला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम यांची सकाळी स्थानिकवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता भेट होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे मुद्दे –

-दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन हे किम आणि त्यांच्या नऊ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची दोन्ही देशांच्या सीमेजवळ भेट घेतील. त्यानंतर पॅन्मुन्जोम येथे दक्षिण कोरियाचे रक्षकदल दोन्ही नेत्यांना घेऊन येतील. पॅन्मुन्जोम दोन्ही देशांतील लष्करमुक्त प्रदेश आहे.
– या परिषदेसाठी किम जोंग उन यांच्या शिष्टमंडळात त्यांची बहिण किम यो-जोंगचाही समावेश आहे. किम योंग-नाम हे उत्तर कोरियाचे नामधारी प्रमुख आहेत तेसुद्धा या चर्चेत सहभागी होतील.
– पॅन्मुन्जोम येथील पीस हाऊस या इमारतीत स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता चर्चेला सुरुवात होईल.
– पहिल्या सत्रानंतर भोजनासाठी उत्तर कोरियन शिष्टमंडळ व किम पुन्हा आपल्या देशात जातील. जेवणानंतर ते पुन्हा चर्चेसाठी सीमा ओलांडून द. कोरियात येतील.
– दुपारच्या सत्रात शांतता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून दोन्ही देशांची माती आणि पाणी वापरुन एका पाईनच्या रोपाचे रोपण दोन्ही नेते करतील.
– मून जाए-इन यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6.30 वाजता भोजनाचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये किम जोंग उनची पत्नी री सोल जू देखील सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्रांचा भविष्यात त्याग करू शकेल का या संपूर्ण जगासाठी महत्त्वाच्या विषयावर यामध्ये चर्चा होऊ शकते.
-तसेच या दोन्ही शेजारी देशांमधील तणाव निवळण्यासाठीही या परिषदेचा उपयोग होऊ शकतो.
-यापूर्वी 2000 आणि 2007 साली अशाच प्रकारची परिषद झाली होती.
-या बैठकीमुळे किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या चर्चेसाठीही आशादायक प्रगती होणार आहे.