सध्या उत्तर कोरिया आणि अमेरिका हे दोन्ही देश परस्परांविरोधात आग ओकत आहेत. याच दरम्यान उत्तर कोरियाने अमेरिकेला धमकावले आहे. अमेरिकेने आमच्या देशाविरोधात लष्करी कारवाई केल्यास सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब प्रशांत महासागरात टाकू, असे परराष्ट्र मंत्री री याँग यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन याने काही तासांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही धमकावले होते.

प्रशांत महासागरातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बस्फोट असेल. ही कारवाई कशी करणार आहोत, याबाबतचा निर्णय घेण्यात आला नाही. किम जाँग उन यांच्या आदेशानंतरच हा निर्णय घेण्यात येईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला चोख प्रत्युत्तर देण्याचा उन यांचा विचार आहे, असे परराष्ट्रमंत्री याँग यांनी सांगितले. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत सहभागी होण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

अमेरिकेला किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी उत्तर कोरियाचे हुकूमशहा उन याने दिली होती. याबाबत विचारलेल्या प्रश्नांना याँग यांनी उत्तरे दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत उत्तर कोरियाला पूर्णपणे नष्ट करण्याची धमकी दिली होती. रॉकेट मॅन (उन) स्वतः आणि आपल्या देशासाठी ‘सुसाईड मिशन’वर आहे, असा टोलाही लगावला होता. जर उत्तर कोरियाने अमेरिका किंवा सहकारी देशांवर हल्ला केल्यास वॉशिंग्टनजवळील प्योंगयाँगला नष्ट करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर उन याने ट्रम्प यांना वेडा आणि अध्यक्षपदासाठी अपात्र असल्याचे म्हटले होते. उत्तर कोरियाला नष्ट करण्याची धमकी देणाऱ्या ट्रम्प यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असे उन म्हणाला होता.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीलाच उत्तर कोरियाने सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली होती.