उत्तर कोरियाच्या मुख्य अणुचाचणी केंद्रातील हालचालींमध्ये वाढ झाल्याची गुप्तवार्ता असून, त्यावरून हा देश चौथ्या अणुचाचणीची तयारी करीत असल्याचे स्पष्ट होत आहे, असा दावा दक्षिण कोरियाने केला आहे.
दक्षिण कोरियातील एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवडय़ापासून उत्तर कोरियाच्या पूंगायी-री अणुचाचणी केंद्रामधील कर्मचाऱ्यांच्या आणि वाहनांच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाल्याचा अहवाल दक्षिण कोरियाच्या गुप्तचरांनी दिला आहे. दक्षिण कोरियाच्या संसदीय समितीसमोरील सुनावणीदरम्यान विलीनीकरण मंत्री ऱ्यू किल-जे यांनी या बातमीवर शिक्कामोर्तब केले. मात्र ते खरोखरच अणुचाचणीची तयारी करीत आहेत, की तो दक्षिण कोरिया आणि अमेरिकेवर दबाव आणण्याचा कावा आहे हे जाणून घेण्यात येत आहे, असेही या मंत्र्यांनी सांगितले.
दक्षिण कोरियाई गुप्तचरांच्या अहवालानुसार, उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनाऱ्यावर फिरत्या प्रक्षेपक वाहनांवर दोन मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे लादली आहेत. उत्तर कोरियाचे दिवंगत नेते किम संग -२ यांच्या जयंतीपूर्वी, म्हणजेच १५ एप्रिलपूर्वी या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात येणार आहे.
येत्या बुधवारपूर्वी विदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांनी देश सोडून जावे असे उत्तर कोरियाने सुचविले आहे. त्यापूर्वी किंवा नंतर ही क्षेपणास्त्रे चाचणी करण्याकरिता म्हणून डागण्यात येतील, अशी शक्यता राष्ट्राध्यक्ष पार्क ग्यून हे यांचे मुख्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किम जँग-सू यांनी वर्तविली आहे.
दरम्यान, जपानला लक्ष्य करणारी उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे हवेतच गारद करण्याचे आदेश जपानने आपल्या लष्कराला दिले असल्याचे जपानी लष्कराच्या प्रवक्त्याने मंगळवारी येथे सांगितले.
मून यांचा सबुरीचा सल्ला
हेग : उत्तर कोरिया चौथ्या अणुचाचणीच्या तयारीत असल्याच्या वृत्ताची दखल घेत, या देशाने आता असे चिडवण्याचे प्रकार थांबवावेत, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की-मून यांनी सोमवारी केले. उत्तर कोरियाने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या तिसऱ्या अणुचाचणीनंतर दक्षिण व उत्तर कोरियात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.