मतदानोत्तर चाचण्यांच्या भाकितात त्रिपुरा, नागालॅण्ड, मेघालयमध्ये सत्ताबदल

ईशान्येतील रणधुमाळीत भाजप त्रिपुरातील सत्ता माकपकडून हिसकावून घेणार का, नागालॅण्ड पीपल्स फ्रण्ट नागालॅण्डमध्ये सत्ता राखणार का आणि मेघालयात प्रस्थापितविरोधी आघाडीशी काँग्रेस दोन हात करणार का, या प्रश्नांची उत्तरे येत्या ३ मार्च रोजी सापडणार असली तरी मतदानोत्तर चाचणीने मात्र निराळेच संकेत दिले आहेत. या त्रिराज्यांमध्येही भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित करणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे.

त्रिपुरामध्ये गेल्या २५ वर्षांपासून माकपची राजवट असून यंदा मात्र भाजप आयपीएफटीसमवेत तेथे सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. ‘न्यूजएक्स’ने तसे भाकीत केले आहे. भाजप-आयपीएफटी आघाडीला ३५ ते ४५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर माकपचे संख्याबळ ५० वरून १४-२३ पर्यंत खाली येणार आहे. ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने मात्र भाजपला ४५-५० जागा, तर माकपला ९-१० जागा मिळतील अशी शक्यता वर्तविली आहे. नागालॅण्डमध्ये भाजपने नीइफू रिओ यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीपीशी आघाडी केली असून ‘न्यूजएक्स’नुसार, भाजपला २७-३२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एनपीएफला २०-२५ जागा, तर काँग्रेसला ०-२ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मेघालयातही भाजपला लक्षणीय लाभ होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’नुसार, भाजपला ३० पर्यंत जागा मिळतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर काँग्रेसला केवळ २० जागांवर समाधान मानावे लागणार आहे, असे म्हटले आहे. तथापि, कॉनरड संगमा यांच्या नेतृत्वाखालील एनपीपीला जास्तीत जास्त २३-२७ जागा मिळतील, असा अंदाज ‘न्यूजएक्स’ने वर्तविला आहे.