लसींनंतर करोनाची मगरमिठी सैल होण्याची आशा व्यक्त केली जात असतानाच नॉर्वेतून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. लसीकरणानंतर काही वेळातच २३ वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर अनेकजण आजारी पडले आहेत. या घटनेमुळे नॉर्वेची डोकेदुखी वाढवली असून, सरकारने या घटनांची चौकशी सुरू केली आहे.

द ब्लूमबर्गने याविषयीची वृत्त दिलं आहे. नॉर्वेत लसीकरण सुरू असून, लस घेतल्यानंतर काही वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. फायझर-बायोएनटेक लस घेतल्यानंतर २३ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण आजारीही पडले आहेत. नॉर्वे डॉक्टरांनी या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. ज्या व्यक्ती ८० वर्षांपेक्षा जास्त आहेत. त्यांच्यामध्ये लस घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसून आले आहेत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

या नागरिकांचा मृत्यू फायझर लसीमुळेच झाल्याचं अजून निष्पन्न झालेलं नाही. मात्र, मृत्यू झालेल्या २३ लोकांपैकी १३ जणांमध्ये डायरिया आणि ताप यांची लक्षण दिसून आली असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. नॉर्वेत २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आणि चिंता व्यक्त होऊ लागल्यानंतर फायझरनं युरोपमध्ये केला जाणारा लसीचा पुरवठा तात्पुरत्या काळासाठी कमी केला आहे.

दुसरीकडे फायझरकडून मर्यादित स्वरूपात उत्पादन होत असल्यानं पुरवठा कमी करण्यात आल्याचं नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ विभागानं म्हटलं. प्रतिवर्ष १.३ बिलियनवरून २ बिलियनपर्यंत लसीचं अद्ययावत उत्पादन करण्यासाठी हे करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यासंदर्भात विशेष इशाराही विभागानं दिला आहे. नॉर्वेत डिसेंबरच्या अखेरीपासून आतापर्यंत ३० हजार लोकांना फायझर वा मॉर्डन या दोन्ही एका लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.