कॅग (नियंत्रक आणि महालेखापाल), सीव्हीसी (केंद्रीय दक्षता आयुक्त) आणि सीबीआय (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) हे तीन ‘सी’ ही चांगल्या निर्णयांच्या अंमबजावणीतील धोंड नसून ‘वैयक्तिक लालसेची कीड’ ही या अंमलबजावणीतील खरी अडचण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय दक्षता आयुक्त आर. श्रीकुमार यांनी केले. या तिन्ही ‘सीं’कडून विचारले जाणारे प्रश्न हा जनहिताच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रकार नसून उलट पारदर्शकतेसाठी केलेला प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनेक घोटाळ्यांची चौकशी करताना आम्हाला त्यामागे ‘हावरेपणा’ हेच प्रमुख कारण असल्याचे आढळले आहे, असे सांगत श्रीकुमार यांनी टू जी स्पेक्ट्रमचे उदाहरण दिले. या प्रकरणामध्ये झालेला फायदा हा कोणाच्या खिशात जायला हवा होता आणि तो कोणाच्या खिशात गेला, एव्हढाच आपला सवाल असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज् अर्थात सीआयआयने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिथे जनहिताशी तडजोड स्वीकारली जाते तिथून समस्येला सुरुवात होते, असे श्रीकुमार यांनी सांगितले. कोळसा घोटाळा असो वा खाण घोटाळा, प्रत्येकच ठिकाणी वैयक्तिक लालसा जनहितास बाजूला सारताना आढळते आणि ही लालसाच देशासाठी घातक आहे, असे आयुक्तांनी ठामपणे सांगितले.
विविध शासकीय संस्थांकडून खर्चाबाबत उपस्थित केलेले प्रश्न ही शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचण असल्याचा प्रचार जर कोणी करीत असेल तर ते निव्वळ ढोंग आहे, उलट चांगल्या शासकीय योजनांची व्यावसायिक दृष्टिकोनविरहित अंमलबजावणी ही खरी समस्या असल्याचे श्रीकुमार म्हणाले.