जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे गुरुवारी पहाटे अतिरेकी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत जैश-ए-मोहम्मदच्या चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून भारतीय लष्कर पाकिस्तान आणि चीन या दोन देशांविरोधात सीमेवर लढत आहे. नागरोटा चकमकीनंतर भारतीय लष्कप्रमुख एम.एम. नरवणे यांनी अतिरेक्यांना इशारा दिला आहे. नियंत्रण रेषेवरुन घुसखोरीचा प्रयत्न करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही अशा शब्दांत नरवणे यांनी भारतीय लष्कराची भूमिका स्पष्ट केली आहे.

तांदळाच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रकमधून प्रवास करणाऱ्या अतिरेक्यांविरोधात भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईचं लष्करप्रमुख नरवणे यांनी कौतुक केलं. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सैन्य दलातील उत्तम समन्वयामुळे ही गोष्ट शक्य झाल्याचं नरवणे म्हणाले. घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना अशाच पद्धतीने परिणामांना सामोरं जावं लागेल असं नरवणे म्हणाले.

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात गुरुवारी पहाटे अतिरेकी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बान टोलनाक्यावर गुरुवारी पहाटे पाच वाजता दहशतवादी आणि भारतीय जवान आमनेसामने आले. यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. या पार्श्वभूमीवर नागरोटा परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून जम्मू-श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.