मी कोणत्याही धमक्यांना भीत नाही, देशासाठी गोळ्या झेलण्यासही तयार आहे असं वक्तव्य भाजपा खासदार रवी किशन यांनी केलं. मी माझं वक्तव्य अत्यंत योग्य वेळी केलं आहे. मी ड्रग्ज विरोधात आवाज उठवला कारण मला सिनेसृष्टीतील तरुणांची काळजी वाटते आहे. एवढंच नाही तर सिनेसृष्टीविषयीही काळजी वाटते आहे. मी माझ्या आयुष्याचा विचार अशा वेळी करत नाही. देशाच्या भविष्यासाठी गोळ्या झेलण्याचीही माझी तयारी आहे असं रवी किशन यांनी म्हटलं आहे. रवी किशन हे भाजपाचे गोरखपूरचे खासदार आहेत. त्यांना धमकी देणारे काही फोन कॉल्स आले होते. त्याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी देशासाठी गोळ्या झेलायला तयार आहे असं म्हटलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

धमकी देणारे कॉल तुम्हाला आले का? असा प्रश्न जेव्हा रवी किशन यांना विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले यावर मी वेळ आल्यावर नक्की भाष्य करेन मात्र तूर्तास देशातल्या तरुण पिढीसाठी मी आवाज उठवला आहे. मी योग्यवेळी बोललो आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच देशाच्या भविष्यासाठी दोन चार गोळ्या झेलाव्या लागल्या तरी पर्वा नाही असंही ते म्हणाले.

काय म्हणाले होते रवी किशन?
भोजपुरी सुपरस्टार आणि भाजपा खासदार रवी किशन यांनी बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनचा मुद्दा लोकसभेत १४ सप्टेंबरला मांडला होता. “ड्रग्ज तस्करीची समस्या वाढते आहे. देशाच्या तरुण पिढीला ड्रग्जच्या माध्यमातून उद्धवस्त करण्याचे षडयंत्र रचले जाते आहे. आपले शेजारी देश यासाठी योगदान देत आहेत. दरवर्षी पाकिस्तान व चीनमधून पंजाब व नेपाळमार्गे आपल्या देशात अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. सिनेसृष्टीतही अनेकजण ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहेत ”

रवी किशन यांनी बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनचा मुद्दा संसदेत मांडल्यानंतर राज्यसभेच्या खासदार जया बच्चन चांगल्याच चिडल्या होत्या. त्यांनी जिस थालीमें खाते हैं उसी थालीमें कुछ लोग छेद करते हैं असं म्हणत रवी किशन यांच्यावर टीका केली होती. या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं होतं तसंच अनुराग कश्यपने जे आरोप रवी किशन यांच्यावर केले होते त्याचंही उत्तर रवी किशन यांनी दिलं होतं.