सुब्रह्मण्यम स्वामी यांची अर्थमंत्र्यांवर टीका

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी अधिक जोरदार हल्ला चढविला. जेटली यांना उत्तर देण्यास जबाबदार असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकान्त दास यांना डॉ. स्वामी यांनी गुरुवारी लक्ष्य केले.

मुख्य आर्थिक सल्लागारांबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन करताना डॉ. स्वामी म्हणाले की, जेटली यांनी काय वक्तव्य केले, काय नाही केले त्याच्याशी आपल्याला काहीही देणेघेणे नाही, आपण गरज भासेल तेव्हा पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांशी बोलतो. शक्तिकान्त दास यांच्यावर हल्ला चढविल्याने जेटली यांना त्याची बीिजगमधून दखल घ्यावी लागली. अर्थमंत्रालयातील शिस्तप्रिय सनदी अधिकाऱ्यावर अनुचित टीका केल्याचे जेटली यांनी ट्विट केले.

शक्तिकान्त दास यांनी पी. चिदम्बरम यांना एका मालमत्ता व्यवहारात मदत केली, असा आरोप डॉ. स्वामी यांनी केला. महाबलीपूरम येथील मोक्याची जागा हडप करण्यासाठी दास यांनी पी. चिदम्बरम यांना सहकार्य केले असा मालमत्ता व्यवहाराचा एक खटला दास यांच्याविरुद्ध प्रलंबित आहे, असे डॉ. स्वामी यांनी ट्विट केले.

‘तर मागणी मागे ’

दरम्यान ,यापूर्वी भारतविरोधी भूमिका घेण्याचा आरोप केलेले मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन हे देशभक्त आहेत असे सरकारला वाटत असल्यास त्यांच्या हकालपट्टीची मागणी मागे घेण्यास आपण तयार आहोत, असे  स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.