परीक्षेसाठी आलेल्यांना निवासाची परवानगी नाकारली; साक्षांकनालाही नकार

प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा.. मुलाखतीपर्यंत मजल मारायची.. मुलाखतीसाठी दिल्लीत आल्यावर हक्काचे निवासस्थान म्हणून महाराष्ट्र सदनाचे दार ठोठवावे तर त्यानेच पाठ फिरवावी.. असा दुर्दैवी प्रकार नुकताच दिल्लीत घडला. संघ लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या ‘सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्स’च्या सहाय्यक कमांडंट पदासाठी येथे आलेल्या मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनाचा हा कटू अनुभव आला आहे.

सहाय्यक कमांडंट पदासाठी देशभरातून पात्र ठरलेल्या ५०० विद्यार्थ्यांना दिल्लीत मुलाखतीसाठी यूपीएससीतर्फे पाचारण करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्रातील ३५-४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २१ जानेवारीपर्यंत ही मुलाखत प्रक्रिया सुरू राहणार आहे. या कालावधीत दिल्लीत निवासाची सोय व्हावी म्हणून यातील काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सदनाशी संपर्क साधला. मात्र, त्यांना तेथे राहण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी येथील करोल बाग, राजेंद्रनगर, जीटीबी नगर, मुखर्जी नगर येथे यूपीएससीसाठी तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून स्वतच्या निवासाची व्यवस्था करून घेतली.

अधिकाऱ्यांचे असहकार्य

मुलाखतीसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांनी कागदपत्रे साक्षांकित करण्यासाठी महाराष्ट्र सदनातील काही अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यासही या अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांना त्यांची कागदपत्रे कुरियरने घरी पाठवून तातडीने साक्षांकित करून परत मागवून घ्यावी लागली.

विशेष म्हणजे सदनाच्या व्यवस्थापनात एकही मराठी अधिकारी या विद्यार्थ्यांना आढळून आला नाही. मराठी अधिकारी असता तर असा अनुभव आला नसता, अशी टिप्पणीदेखील एका विद्यार्थ्यांने केली. यासंदर्भात निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद दिला नाही. उपायुक्त समीर सहाय यांनी या प्रकरणी सदन व्यवस्थापकांकडून माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली. उल्लेखनीय म्हणजे गतवर्षी याच परीक्षेसाठी दिल्लीत आलेल्या विद्यार्थ्यांना यूपीएससी (इमारतीत प्रवेश करण्यासाठी) ‘ई-समन’ दाखविल्यानंतर जुन्या महाराष्ट्र सदनात स्वस्त दरात निवास व्यवस्था करण्यात आली होती.

मुलाखती २१ जानेवारीपर्यंत चालणार आहेत. त्यासाठी दिल्लीत आल्यावर महाराष्ट्र सदनात निवासासाठी गेलो. मात्र, तिथे आम्हाला परवानगी नाकारण्यात आली. तसेच कागदपत्रे साक्षांकित करण्यासही नकार देण्यात आला.

मुलाखतीसाठी आलेला विद्यार्थी.

यूपीएससीच्या सर्व प्रकारच्या परीक्षांच्या मुलाखतीसाठी दिल्लीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नाममात्र दरात राहण्याची व्यवस्था सदनाने करावयास हवी. परंतु तसे होत नाही. नियम दाखवून बऱ्याचदा काम टाळले जाते. त्याचाच फटका विद्यार्थ्यांना आताही बसला आहे.

एक वरिष्ठ अधिकारी.