ज्योतिरादित्य सिंधिया आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यातील मतभेदांमुळे मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अडचणीत आले आहे. सिंधिया यांना मानणारे सर्व काँग्रेस आमदार बंगळुरुमध्ये मुक्कामाला आहेत. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारमधील २० मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात पुन्हा एकदा कमळ फुलणार अशी जोरदार चर्चा आहे.

माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांना या परिस्थितीबाबत विचारले असता ते म्हणाले की, “मध्य प्रदेशातील सध्याचे राजकीय संकट हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. मला यावर काहीही बोलायचे नाही. सरकार पाडण्यामध्ये आम्हाला अजिबात रस नाही हे मी पहिल्यादिवशीच बोललो आहे.” मध्य प्रदेशात कुठल्याही एका पक्षाकडे पूर्ण बहुमत नसून, पाठिंब्याने हे सरकार उभे आहे.

“आम्ही ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना स्वाइन फ्ल्यू झाल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्याशी बोलणे होऊ शकलेले नाही” असे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह म्हणाले.

आणखी वाचा- ज्योतिरादित्य सिंधिया यांचे भाजपात नक्कीच स्वागत : नरोत्तम मिश्रा

नरोत्तम मिश्रा काय म्हणाले?
भारतीय जनता पार्टीत प्रत्येकाचे मनापासून स्वागत आहे. आम्ही तळागाळातील कार्यकर्त्यांना देखील सामावून घेतो. सिंधिंयाजी हे खूप मोठे नेते आहेत, त्यांचे नक्कीच स्वागत आहे. असं भाजपा नेते नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं आहे.
कमलनाथ यांच्याविरोधात ज्योतिरादित्य सिंधियांनी बंडाचा झेंडा उभारल्याचे दिसत आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर ज्योतिरादित्य सिंधिया मुख्यमंत्री होणार का? की पुन्हा एकदा शिवराज सिंग चौहान यांचे सरकार येणार आणि ज्योतिरादित्य त्यांना पाठिंबा देणार? या चर्चांना उधाण आलं आहे.