पत्नीला स्वयंपाक करणे ठाऊक नसणे, तिने आपल्या पालकांच्या संपर्कात राहणे किंवा नवऱ्यावर राग व्यक्त करण्याला क्रुरता म्हणता येणार नाही असं पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. पत्नीने क्रूर वागणूक देत २००९ पासून घर सोडले असून ती महेरीच राहत असल्याने दाखल करण्यात आलेल्या घटस्फोटाच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. पतीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत अगदी लहान लहान कारणांवरुन सासरचे लोक माझा छळ करतात म्हणून मी माहेरी राहत असल्याचे या महिलेने स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज फेटाळला आहे.

२००४ साली लग्न झालेले हे दाम्पत्य चंढीगडचे आहे. लग्नानंतर चार वर्षांनी म्हणजेच सप्टेंबर २००८ मध्ये या दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यानंतर या दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागल्यानंतर २०१३ साली पतीने कनिष्ठ न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. २०१५ मध्ये न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर या व्यक्तीने उच्च न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला. लग्न झाल्यापासून माझी पत्नी माझ्याशी आणि माझ्या घरच्यांशी क्रूरपणे वागते असा आरोप या व्यक्तीने आपल्या अर्जात केला आहे. तसेच तिला साधा स्वयंपाकही करता येत नसल्याचेही या अर्जात म्हटले आहे. अनेकदा तिला स्वयंपाक येत नाही या कारणामुळे नाश्ता न करता मला ऑफिसला जावे लागल्याचे अर्जदाराने आपल्या घटस्फोटाच्या अर्जात म्हटले आहे. तसेच माझी पत्नीचे तिच्या आई-वडीलांशी जास्तच सलोख्याने नाते असून तिला इतर कोणाही घरी आलेलं आवडत नाही या आरोपाबरोबरच पत्नीवर व्यभिचाराचा संशय असल्याचे या पतीने आपल्या घटस्फोटाच्या अर्जात म्हटले आहे.

या प्रकरणामध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर ‘या दोघांमध्ये शुल्लक कारणांवरुन भांडणे होतात. अशी भांडणे सर्वच विवाह झालेल्या जोडप्यांमध्ये होतात,’ असे मत खंडपीठाचे न्यायाधीश राजन गुप्ता आणि मंजीरी कौल नेहरु यांनी निर्णय देताना व्यक्त केले आहे. पत्नीच्या वागणुकीमुळे त्याला तिच्या बरोबर राहणे अशक्य झाले आहे हा पतीने केलेला आरोप चुकीचा असल्याचे मत न्यायलयाने नोंदवले आहे. तसेच पतीने केलेल्या व्याभिचाराच्या आरोपामुळे पत्नीलाच मानसिक त्रास झाल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. २९ ऑगस्ट रोजी न्यायलयाने दिलेल्या निर्णयामध्ये ‘अर्जदार पतीला त्याच्या आयुष्यातून पत्नीला काढून टाकायचे असल्याने त्याने अनेक आरोप केले असल्याचं दिसून येत आहे’ असं निरिक्षण नोंदवलं आहे.

कमी हुंडा आणल्यामुळे सासरचे लोक माझा छळ करत होते, अनेकदा मला मारहाण करण्यात आली तसेच अनेक वेळा उपाशीही ठेवण्यात आल्याचा आरोप या महिलेने सासरच्या लोकांवर केला आहे. त्यानंतर मुलगी झाल्यावर माझ्यावर अत्याचार अजून वाढला म्हणूनच माझे आई-वडील मला माहेरी घेऊन गेले असं या महिलेने न्यायलयाला सांगितले. ‘या प्रकरणामध्ये पत्नीने अत्याचार करणाऱ्या पतीविरोधात संबंधिक यंत्रणांकडे अनेकदा तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र या यंत्रणांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळेच तिला पतीविरोधात न्यायलयाची पायरी चढावी लागल्याचे दिसून येत आहे. पतीला कोणत्याही परिस्थितीमध्ये पत्नीपासून वेगळे व्हायचे आहे असं येथे दिसून येत आहे. तर दुसरीकडे आपलं लग्न टिकवण्यासाठी पत्नी माहेरी राहत आहे. त्यामुळेच या प्रकरणात तिला दोषी धरता येणार नाही. उलट पतीनेच या प्रकरणामध्ये खोटी माहिती देत आहे,’ असं सांगत न्यायलयाने पतीने केलेला घटस्फोटाचा हा अर्ज फेटाळला.