इराण बरोबर निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण उद्या युद्ध सुरु झालेच तर ते संपवण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी म्हटले आहे. “आम्हाला इराण बरोबर युद्ध करण्याची इच्छा नाही पण युद्ध सुरु झाले तर, ते समाप्त करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्हाला तणाव कमी झालेला पाहायला आवडेल” असे एस्पर म्हणाले.

अमेरिकेने शुक्रवारी इराणचा टॉप लष्करी कमांडर कासिम सुलेमानीचा एअर स्ट्राइकमध्ये खात्मा केला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्यासारखी स्थिती निर्माण झाली. स्वसंरक्षणार्थ सुलेमानीच्या ताफ्यावर हल्ला केल्याचे अमेरिकेची भूमिका आहे.

सुलेमानीने अमेरिकन व्यक्ती आणि ठिकाणांवर हल्ले करण्याचा कट रचला होता. त्याला रोखण्यासाठी म्हणून एअर स्ट्राइक केल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. इराणच्या सांस्कृतिक ठिकाणांवर हल्ले करुन युद्धासंबंधीच्या कायद्याचे उल्लंघन करणार नसल्याचे संकेत एस्पर यांनी सोमवारी दिले होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने प्रतिहल्ल्याची कारवाई केली तर, ५२ सांस्कृतिक ठिकाणांवर हल्ला करु अशी धमकी दिली होती.

सांस्कृतिक ठिकाणांवर हल्ला करणे युद्ध गुन्हा?

मंगळवारी एस्पर यांना पुन्हा यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ट्रम्प आम्हाला कायदेशीर आदेश देतील असा विश्वास व्यक्त केला. “युद्धादरम्यान आम्ही कायद्याचे उल्लंघन करत नाही” असे एस्पर म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार लष्करी कारवाई दरम्यान सांस्कृतिक ठिकाणांना लक्ष्य करणे युद्ध गुन्हा समजला जातो.

आणखी वाचा – इराणने बॅलेस्टिक मिसाइल्स डागल्याचं अमेरिकेला आधीच कसं कळलं?

इराणने बॅलेस्टिक मिसाइल्स डागल्याचं अमेरिकेला कसं कळलं?
अमेरिकेने बॅलेस्टिक मिसाइल हल्ल्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित केली आहे. इराणकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने, अमेरिकेने इराकमधील आपल्या दोन्ही तळांवर आधीपासूनच तयारी करुन ठेवली होती. “पूर्वसूचना देणाऱ्या या यंत्रणेकडून मिसाइल हल्ल्याची माहिती मिळताच वेळेत सर्व नागरिकांनी बंकर्समध्ये हलवण्यात आले” अशी माहिती अमेरिकन लष्कराच्या अधिकाऱ्याने सीएनएन या वृत्तवाहिनीला दिली.