पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन महत्वाचे सहकारी अरुण जेटली आणि अमित शाह यांना पुढचे काही दिवस सक्रीय राजकारणापासून दूर रहावे लागणार आहे. आजारपणामुळे त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला गेले आहेत. आठवडा अखेरीस जेटली मायदेशी परततील असे सूत्रांनी सांगितले.

मागच्यावर्षी अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. जेटली यांना कॅन्सर झाल्याचे वृत्त काल माध्यमांनी दिले होते. मोदींचे दुसरे विश्वासू सहकारी अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला असून त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढचे दोन ते तीन दिवस त्यांना रुग्णालयातच रहावे लागेल अशी सूत्रांची माहिती आहे.

जेटली आणि शाह यांच्याशिवाय भाजपाचे आणखीही काही नेते आजारी आहेत. नाकाच्या त्रासामुळे केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांना सोमवारी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना आजच डिस्चार्ज मिळाला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम लाल यांना तापाचा त्रास होत असल्यामुळे सुद्धा नोएडाच्या कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मनोहर पर्रिकर
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरही आजारी आहेत. ते मोदी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. अलीकडेच गोव्यातील कामांची पाहणी करतानाचा त्यांचा एक फोटो समोर आला. त्यात त्यांच्या नाकाला टयुब लावलेली होती.