मागच्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. पण फक्त महाराष्ट्रच नाही, तर देशाच्या अन्य राज्यातही करोना रुग्णांची संख्या वाढतेय. मागच्या आठवडयात केरळ, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले.
महाराष्ट्राप्रमाणे पंजाबमध्येही मागच्या आठवड्याभरात अचानक रुग्णवाढ दिसून आली आहे. मागच्या २४ तासात पंजाबमध्ये ३८३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मागच्या आठवड्याभरात महाराष्ट्रात अचानक करोना रुग्णवाढ दिसून आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारला राज्याच्या काही भागात निर्बंध लागू करावे लागले आहेत.
शुक्रवारी संपूर्ण देशामध्ये फक्त महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली. मागच्या २४ तासात ६,११२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात सध्याच्या घडीला १ लाख ४३ हजार १२७ करोना रुग्ण उपचाराधीन आहेत. मागच्या सात दिवसात केरळमध्ये मोठया संख्येने करोना रुग्णांची नोंद होतेय. छत्तीसगडमध्ये करोना रुग्णांचा आकडा वाढतोय. मागच्या २४ तासात तिथे २५९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाल्याचे केंद्राने म्हटले आहे.
करोनाच्या फैलावाची साखळी तोडण्यासाठी करोना नियमांचे पालन आवश्यक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशभरातील अॅक्टीव्ह करोना केसेसपैकी फक्त महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातूनच ७५.८७ टक्के करोना रुग्ण असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. मागच्या २४ तासात देशातील १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये करोनामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाहीय.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 4:18 pm