संरक्षण मंत्रिपदाच्या चर्चेचे अमित शहांकडून खंडन

केंद्रीय मंत्री होण्याबाबतच्या सर्व चर्चांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी पूर्णविराम दिला. केंद्रीय मंत्रिपदाचा मुद्दाच नाही. मी तर २०१९मधील लोकसभा निवडणुकीचे आव्हान पेलण्याची तयारी करतो आहे, या शब्दांत त्यांनी खंडन केले.

केंद्रात मंत्री होण्याची कोणतीही योजना नाही. मी जिथे आहे, तिथे आनंदी आहे. २०१९मधील लोकसभा तयारीला लागलो आहे. पक्षविस्ताराचे आव्हान आहे, असे त्यांनी निवडक माध्यमांना सांगितले. याच भूमिकेचा त्यांनी लखनौमधील पत्रकार परिषदेतही पुनरूच्चार केला.

आतापर्यंत गुजरातमध्ये आमदार असलेल्या शहांनी गुजरातमधूनच राज्यसभेसाठी अर्ज भरल्यापासून ते केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

काही उत्साही माध्यमांनी तर त्यांना संरक्षणमंत्रिपद देऊ केले होते. मात्र, मंत्री झाले असते तर त्यांना पक्षाध्यक्ष पद सोडावे लागले असते किंवा पक्षाच्या घटनेत खास बदल तरी करून घ्यावा लागला असता. शहांच्या स्पष्टोक्तीनंतर मंत्रिपदाच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची आशा आहे.