News Flash

अमित शाह म्हणतात, “काही लोकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली पण…”

"माझ्या कामात व्यस्त असल्याने मी या गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं नाही"

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. (संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी ट्विटवरुन आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन केलं आहे. ट्विटवरुन त्यांनी एक निवेदन पोस्ट केलं असून त्यामधून त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांनाही सुनावले आहे. अमित शाह यांच्या तब्बेसंदर्भात मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर उलट सुलट चर्चा सुरु होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केलं आहे.

मागील काही आठवड्यांपासून माझ्या तब्बेतीसंदर्भात सोशल मिडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्विट करुन प्रार्थनाही केली अशी सुरुवात करत अमित शाह यांनी कामात व्यस्त असल्याने आपण या अफवांकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. मात्र पक्ष कार्यकर्ते आणि शुभचिंतकांच्या काळजीपोटी आज आपण ठणठणीत असल्याचं मला सांगावं लागत असल्याचेही शाह यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विटवरुन ‘माझ्या तब्बेतीची चिंता करणाऱ्या सर्वांसाठी माझा संदेश’ या कॅप्शनसहीत एक निवेदन ट्विट केलं आहे.

अमित शाह यांची पोस्ट जशीच्या तशी

“मागील काही दिवसांपासून काही मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या आरोग्यासंदर्भात वाटेल त्या अफवा पसरवल्या. काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्विट करुन प्रार्थनाही केली.

देश सध्या करोनासारख्या जागतिक महारोगाशी लढा देत आहे. देशाचा गृहमंत्री म्हणून मी रात्रंदिवस माझ्या कामात व्यस्त असल्याने मी या गोष्टींकडे फारसे लक्ष दिलं नाही. जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली तेव्हा मी विचार केला की हे सर्व लोक त्यांच्या काल्पनिक आनंदामध्ये जगत आहेत. त्यामुळेच मी कोणतेही स्पष्टीकरण दिले आहे.

मात्र माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांमुळे आणि माझ्या शुभचिंतकांमध्ये मागील दोन दिवसापासून यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात होती. त्यांच्या चिंतेकडे मी कानाडोळा करु शकत नाही. त्यामुळेच मी आज हे स्पष्ट करु इच्छितो की मी पूर्णपणे बरा आहे मला कोणताही आजार झालेला नाही.

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार असं मानलं जातं की अशाप्रकारची अफवा पसरवल्यास व्यक्ती अधिक मजबूत होते. त्यामुळे मी अशा सर्व लोकांकडून अपेक्षा करतो की त्यांनी या व्यर्थ गोष्टी करु नयेत आणि मला माझे काम करु द्यावे तसेच त्यांनी स्वत:चे काम करावे.

माझ्या तब्बेतीबद्दल चिंता करणाऱ्या आणि विचारपूस करणाऱ्या माझ्या सर्व शुभचिंतकांचे आणि कार्यकर्त्याचे आभार मानतो.

ज्या लोकांनी ही अफवा पसरवली आहे त्या लोकांविरोधात माझ्या मनात कोणताही राग नाही
– अमित शाह

नक्की वाचा >> Coronavirus: अमित शाह ठणठणीत; त्या एका फोटोमुळे सरकारलाच करावा लागला खुलासा

शाह यांच्या तब्बेतीसंदर्भात सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या अफवांसंदर्भात एप्रिल महिन्यामध्येही सकरकारच्या पत्रसूचना विभागालाच (पीआयबी) ट्विटवरुन खुलासा केला होता. “एका हिंदी वृत्तवाहिनीच्या नावाने मॉर्फ (छेडछाड आणि बदल) केलेला एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होता आहे. या फोटोमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हा फोटो खोटा असून गोंधळ निर्माण करण्याच्या हेतूने तो व्हायरल केला जात आहे. कृपया हा फोटो शेअर आणि फॉर्वर्ड करु नका,” असं आवाहन पीआयबीने केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 4:39 pm

Web Title: not suffering from any disease amit shah on rumours about his health scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “गुजरातमधून करोना हद्दपार करायचा असेल, तर मुख्यमंत्र्यांना हटवा”; भाजपाच्या खासदाराची मागणी
2 ‘त्या’ रुग्णांना करोना चाचणी न करताच घरी जाऊ देणार; केंद्राच्या नव्या सूचना
3 छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका
Just Now!
X