रविवारी लोकसभेच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. त्यामध्ये भाजप आणि मित्रपक्ष बहुमताचा आकडा गाठणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. त्यानंतर एक्झिट पोलवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अशातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना एक्झिट पोल आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

अफवा आणि एक्झिट पोलच्या शक्यतांवर हिंमत हरू नका. तुमचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी अशाप्रकारची अफवा परवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तुमची सतर्कता महत्त्वाची आहे. निकालाच्या दिवशी स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्रांवर खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी ऑडिओ क्लिपद्वारे केले आहे. यापूर्वी अनेक विरोधी पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्ट्राँग रूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. ईव्हीएममध्ये फेरफार केल्याची शंका असल्याने विरोधी पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्ट्राँग रूमकडे धाडले होते. या निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागेल, असेही विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. काही विरोधकांनी ट्विट करूनही आपली नाराजी व्यक्त केली होती.

लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान रविवारी संध्याकाळी पूर्ण झाले. त्यानंतर अनेकांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले. परंतु एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर पुन्हा एकदा रालोआलाच सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, भाजपा बहुमताचा आकडा गाठेल किंवा नाही याबाबत शक्यता वर्तवण्यात आली नसली तरी रालोआ बहुमताचा आकडा पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.