केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) पिंजऱयातील पक्षी किंवा कॉंग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणणे म्हणजे त्याची प्रतिष्ठा कमी करण्यासारखेच आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी व्यक्त केले. 
सीबीआयच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादातील एका चर्चासत्रामध्ये चिदंबरम सहभागी झाले होते. त्यावेळी ते म्हणाले, जगातील सर्वोत्कृष्ट तपास यंत्रणांपैकी सीबीआय ही एक आहे. त्यामुळे पिंजऱयातील पक्षी किंवा कॉंग्रेस ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणणे म्हणजे त्याची प्रतिष्ठा कमी करण्यासारखेच आहे. सीबीआयची कार्यकक्षा किंवा कार्यवाहीसंदर्भातील नियम ठरविण्याचे काम या संस्थेचे नाही, याकडेही चिदंबरम यांनी लक्ष वेधले. सीबीआयलाही अधूनमधून आपल्याला अधिक स्वायत्तता मिळायला हवी, असे वाटत असते, असा टोलाही त्यांनी लगावला.
चिदंबरम यांनी आपल्या भाषणात आर्थिक गुन्ह्यांवर जास्त भर दिला. ते म्हणाले, आर्थिक गुन्ह्यांना आता भौगोलिक सीमा राहिलेल्या नाहीत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रतिष्ठीत पद्धती वापरून आर्थिक गुन्हे केले जातात. त्यामुळे सीबीआयने आर्थिक गुन्ह्यांचा तपासही यापुढे करायला हवा.