राज्यसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय समाविष्ट करण्याला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. यावरुन काँग्रेसने राज्यसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय समाविष्ट घटनाबाह्य असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. राज्यसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय उपलब्ध करुन दिल्याची माहिती काँग्रेस पक्षाला नव्हती, असे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी म्हटले.

‘संविधानात सुधारणा केल्याशिवाय निवडणूक आयोग राज्यसभा निवडणुकीत नोटा पर्यायाचा वापर करु शकत नाही. राज्यसभा निवडणुकीत नोटा पर्यायाचा वापर झाल्यास ते संविधानाच्या अनुच्छेद ८४ चे उल्लंघन ठरेल,’ असे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटले. ‘राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार पक्षाकडून निवडले जातात. या निवडीची पवित्रता कायम राखण्यासाठी पक्षात शिस्त आवश्यक आहे. त्यामुळेच लोकप्रतिनिधींना इतर पर्याय देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. त्यामुळेच राज्यसभेच्या निवडणुकीत नोटा हा पर्याय देण्याची आवश्यकताच नाही,’ असे शर्मा यांनी म्हटले. नोटाचा पर्याय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी असल्याचेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनीदेखील आनंद शर्मा यांच्या सूरात सूर मिसळत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘आम्ही निवडणूक आयोगाला राज्यसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाऊ नये, यासाठी अपील केले आहे. याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी जर निवडणूक आयोगाला ठराविक मुदत हवी असेल, तर त्यांनी हा मुद्दा स्पष्ट करावा,’ असे मनीष तिवारी यांनी म्हटले.

सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलण्याआधी आनंद शर्मा यांनी राज्यसभेतदेखील हा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेससह विरोधी पक्षांनी यावरुन मोठा गदारोळ केला. विरोधकांच्या गोंधळामुळे दोन वेळा राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. या प्रकरणावरुन सत्ताधारी पक्षाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, बहुजन समाजवादी पक्षाचे सतीश मिश्रा, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आणि तृणमूलचे डेरेक ओब्रायन यांनी केली.

विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना राज्यसभेत नोटा पर्याय असावा की नसावा, याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले. राज्यसभा निवडणुकीत गुजरातवरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरु आहे. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल मैदानात उतरले आहेत. राज्यसभेतील पुनरागमनासाठी अहमद यांचे प्रयत्न सुरु आहेत. तर काँग्रेसचे आमदार फोडून अहमद यांना पराभूत करण्यासाठी भाजपने संपूर्ण जोर लावला आहे.