खूप विचार, मंथन करून देशात बदल घडवून आणण्यासाठी आणि राजकीय व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी उत्स्फूर्तपणे काम करणारे ख्यातनाम पत्रकार व लेखक खुशवंत सिंग खुशवंत सिंग यांचे आज (गुरूवार) नवी दिल्ली येथे निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. नवी दिल्ली येथील लोधी स्मशानभूमीत चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विशेष लेख  – मनमौजी
पाकिस्तानातील हदाली येथे २ फेब्रुवारी १९१५ रोजी त्यांचा जन्म झाला होता. ‘योजना’चे संस्थापक-संपादक होते. तसेच इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया, नॅशनल हेराल्ड आणि हिंदुस्तान टाईम्सचे संपादकपदही त्यांनी भूषविले होते.
१९८० ते १९८६ या कालावधीत सिंग हे संसदेचे सदस्य होते. १०७४ साली त्यांना पद्म भूषण बहाल करण्यात आले होते. मात्र, १९८४ साली सुवर्ण मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंत त्यांनी पद्म भूषण हा किताब भारत सरकारला परत केला होता. २००७ साली सिंग यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते.
बुकमार्क : खुशवंतीय धडे!
नुकताच त्यांनी आपला ९८वा वाढदिवस साजरा केला होता, त्यावेळी ‘खुशवंतनामा’ हे नवीन पुस्तक सादर केले होते. ‘खुशवंतनामा – द लेसन्स ऑफ माय लाइफ’ असे या पुस्तकाचे नाव असून, त्यात त्यांनी निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी व आरोग्यपूर्ण कसे जगावे याविषयी काही मते मांडली आहेत. भारतातील राजकारण, राजकारणी व देशाचे भवितव्य, धर्म म्हणजे काय यावरही भाष्य केले आहे.
ट्रेन टू पाकिस्तान, आय शाल नॉट हिअर नाइटिंगेल, दिल्ली ही त्यांची पुस्तके गाजली. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी द सनसेट क्लब ही कादंबरी लिहिली. अ हिस्टरी ऑफ सीख्स हे त्यांचे पुस्तक शीख धर्म व संस्कृतीवर आधारित आहे. ट्रथ, लव्ह अँड लिटल मलाइस हे त्यांचे आत्मचरित्र २००२ मध्ये प्रसिद्ध झाले.