नवी दिल्ली : मल्याळी काव्यातील आदरणीय व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध कवी अक्किथम यांची २०१९ या वर्षांसाठीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ५५व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली.

ज्ञानपीठ निवड मंडळाने शुक्रवारी ही घोषणा केली. अक्किथम अत्युथन नंबूथिरी असे त्यांचे पूर्ण नाव असून ते अक्किथम या नावाने सुपरिचित आहेत. कवितेबरोबरच त्यांनी नाटय़, टीकात्मक निबंध, बालसाहित्य, लघुकथा आदी साहत्यिाच्या क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटविला आहे.

अक्किथम यांची ५५ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी ४५ कवितासंग्रह आहेत, त्यामध्ये खंडकाव्य, कथाकाव्य, चरित्रकाव्य आणि गाणी यांचा समावेश आहे. वीरवदम, बळिदर्शनम, निमिषा क्षेत्रम, अमृत खतिका, अक्किथम कवितका, अंतिमहाकालम ही त्यांची गाजलेली निर्मिती आहे.

अक्किथम यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले आहे.  त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार (१९७३), केरळ साहित्य अकादमी पुरस्कार (१९७२ आणि १९८८), मातृभूमी पुरस्कार, वायलर पुरस्कार आणि कबीर सन्मानानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या साहित्याचा देशी आणि परदेशी भाषांत अनुवाद  करण्यात आला आहे.