सध्या काही देश चीनकडून आर्थिक मदत घेत आहेत पण फुकटात काहीच मिळत नसते हे या देशांच्या लवकरच लक्षात येईल असे भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे. रविवारी पुण्यात औंध येथे सैन्याच्या एका समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले. भारताचा जवळच मित्र असलेला नेपाळ सध्या चीनच्या निकट जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना रावत म्हणाले कि, ज्या देशाला आपली आर्थिक प्रगती करायची आहे, त्यांना इतर देशांबरोबर द्विपक्षीय आणि सहकार्याचे संबंध ठेवावेच लागतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या चीनकडे भरपूर पैसा आहे. जे देश त्यांच्याकडून आर्थिक मदत घेत आहेत त्यांना लवकरच लक्षात येईल कि, फुकटात काहीच मिळत नसते. सर्व संबंध तात्पुरते आहेत. जागतिक स्तरावर सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलल्यानंतर या संबंधांमध्ये बदल होणारच असे रावत म्हणाले. दोन देशांचे संबंध कसे बदलतात त्याचे अमेरिका-पाकिस्तान उत्तम उदाहरण आहे.

काही वर्षांपूर्वी अमेरिका-पाकिस्तानचे उत्तम संबंध होते पण आता तशी स्थिती राहिलेली नाही. त्यामुळे आपल्याला अशा कुठल्याही तात्पुरत्या संबंधांची चिंता करण्याचे कारण नाही. आपल्याला आर्थिक दृष्टया स्वत:ला अधिक मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे असे रावत म्हणाले. भौगोलिक स्थितीमुळे नेपाळ आणि भूतान या देशांनी भारतासोबत राहिले पाहिजे असे ते म्हणाले.

भारत शेजारच्या देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न करत आहे असे ते म्हणाले. चीन आणि भारत दोन्ही देशांची दक्षिण आशियावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. भारताच्या आर्थिक प्रगतीमुळे दहशतवादाचा धोका आणखी कमी होईल असे रावत म्हणाले.

More Stories onचीनChina
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nothing comes for free army chief bipin rawat
First published on: 17-09-2018 at 16:28 IST