रानटीपणाचा प्रत्यय देत पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय जवानांच्या केलेल्या नृशंस हत्या व शिरच्छेदाबाबत आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात पाकिस्तानवर खटला भरावा, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला नोटीस दिली.
पाकिस्तानने ८ जानेवारीला हे नृशंस कृत्य करूनही सरकारने त्याविरोधात कोणतीही हालचाल केलेली नाही, असा दावा करीत सर्व मित्तर यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेबरोबरच कारगिल युद्धात कॅप्टन सौरभ कालिया यांच्या मृतदेहाचीही पाकिस्तानने विटंबना केल्याबद्दल दाखल झालेली याचिका न्यायालयाने संलग्न केली आहे.
पाकिस्तानी सैनिकांचे अश्लाघ्य कृत्य हे जीनिव्हा कराराचाही भंग करणारे असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचणे आवश्यक आहे, असे अर्जदार मित्तर यांनी म्हटले आहे. कॅप्टन कालिया यांच्या पुत्रानेही १९९९ च्या कारगिल युद्धात आपल्या वडिलांना हाल हाल करून मारले गेले आणि त्यांच्या मृतदेहाचीही विटंबना झाली. त्यामुळे पाकिस्तानविरोधात हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला भरावा, अशी मागणी केली होती. आपल्या वडिलांसह पाच सैनिकांना पाकिस्तानने १५ मे १९९९ रोजी पकडून नेले होते आणि त्यांची हत्या केली होती, असा आरोप याचिकेत आहे. या याचिकांबाबत चार आठवडय़ात बाजू मांडण्यास न्या. पी. सत्यशिवम आणि न्या. जे. एस. खेहर यांच्या खंडपीठाने केंद्रास सांगितले आहे.
पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करीत शस्त्रसंधी कराराचा भंग तर केलाच पण दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्यानंतर उभय देशांतील तणाव कमालीचा वाढला होता.