फ्लिपकार्ट व पतंजली पेय  यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी केली नसून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांचाही  भंग केला, या कारणास्तव त्यांना  उद्योग बंद करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. आदित्य दुबे या सोळा वर्षांच्या मुलाने याबाबत हरित लवादाकडे दाद मागितली होती. त्यात अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या ई व्यापार कंपन्या पॅकेजिंगसाठी प्लास्टिकचा अतिरेकी वापर करतात असे म्हटले होते.

राष्ट्रीय हरित लवादाला दिलेल्या माहितीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे की, आम्ही या दोन उद्योगांशी सातत्याने संपर्क साधूनही त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ५ अन्वये त्यांना ८ ऑक्टोबर रोजी नोटीस दिली आहे. त्यात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम २०१८ अनुसार या दोन्ही उद्योगांनी पर्यावरण भरपाई द्यावी. तसेच त्या दोन्ही उद्योगांचे संचालन बंद का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाला सांगितले की, हिंदुस्थान कोका कोला बिव्हरेजेस प्रा. लि., पेप्सिको इंडिया होल्डिंग प्रा. लि. ,बिसलेरी बिव्हरेजेस लि. यांनी आमच्याकडे नोंदणी केली आहे, पण त्यांनी उत्पादक उत्तरदायित्वाची जबाबदारी पार पाडल्याचा अनुपालन अहवाल सादर केलेला नाही. त्यांनी जी जुजबी कागदपत्रे सादर केली त्याला राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिलेली नाही.