ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या दोन ट्वीटची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली आहे.

संबंधित ट्वीट काढून का टाकले नाहीत, अशी विचारणाही न्यायालयाने ट्विटर कंपनीला केली आहे. या प्रकरणी महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनाही नोटीस बजावण्यात आली असून सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे. पुढील सुनावणी ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यावर भूषण यांनी टिप्पणी केली होती.

तसेच, गेल्या सहा वर्षांतील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारेही ट्वीट केले होते. हा न्यायालयाचा अवमान असून भूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वकील महेश महेश्वरी यांनी केली होती. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दोन ट्वीटबद्दल भूषण यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अरुण मिश्रा, न्या. भूषण गवई आणि न्या. कृष्ण मुरारी यांनी भूषण यांच्यासह ट्विटर कंपनीलाही आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. ट्विटरने भूषण यांचे दोन ट्वीट काढून का टाकले नाहीत, अशी विचारणा बुधवारी  केली. त्यावर, न्यायालयाने आदेश दिला तर हे ट्वीट काढून टाकले जातील मात्र स्वत:हून ट्विटर ते काढून टाकू शकत नाही, असे ट्विटरकडून न्यायालयात सांगण्यात आले.