22 September 2020

News Flash

राजस्थान विधानसभा अध्यक्षांना न्यायालयाची नोटीस

बसप आमदारांच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाविरोधात याचिका

संग्रहित छायाचित्र

 

राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षांना, तसेच बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या आणि नंतर पक्षांतर करून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सहा आमदारांना राजस्थान उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटिसा जारी केल्या.

या आमदारांनी काँग्रेसमध्ये पक्षांतर करण्याविरुद्ध बसपने, तसेच भाजप आमदार मदन दिलावर यांनी केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या नोटिसा जारी केल्या. न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष व सचिव आणि ६ आमदारांना नोटिसा जारी करून ११ ऑगस्टपर्यंत त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे, अशी माहिती दिलावर यांच्या वकिलांनी दिली.

बसप आमदारांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार भाजपचे आमदार मदन दिलावर यांनी अध्यक्ष सी.पी. जोशी यांच्याकडे केली होती. ती नाकारण्याच्या अध्यक्षांच्या २४ जुलैच्या आदेशालाही त्यांनी याचिकेत आव्हान दिले आहे.

या याचिकांची सुनावणी केल्यानंतर न्या. महेंद्रकुमार गोयल यांनी नोटिसा जारी केल्या. याचिकांवर प्रतिवादींना वेगवेगळ्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

संदीप यादव, वाजिब अली, दीपचंद खेरिया, लखन मीणा, जोगेंद्र आवाना व राजेंद्र गुढा यांनी २०१८ च्या निवडणुका बसपचे उमेदवार म्हणून जिंकल्या होत्या. सप्टेंबर २०१९ मध्ये हा संपूर्ण गट काँग्रेसमध्ये विलीन झाला.

बसप आमदारांच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणामुळे २०० सदस्यांच्या विधानसभेत सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ १०७ वर पोहचले होते. यामुळे अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठबळ मिळाले होते.

काँग्रेस आमदार १४ ऑगस्टपर्यंत एकत्रच

* राजस्थानच्या सत्तारूढ काँग्रेस पक्षातील फूट टाळण्यासाठी पक्षाच्या आमदारांना गेल्या १५ दिवसांपासून एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असून त्यांना राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनापर्यंत म्हणजे १४ ऑगस्टपर्यंत तेथेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पक्षाच्या एका नेत्याने गुरुवारी सांगितले.

* जयपूर शहरापासून जवळच असलेल्या ‘फेअरमॉण्ट’ हॉटेलवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या आमदारांना १३ जुलैपासून ठेवण्यात आले असून याच हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली आणि त्यामध्ये उपरोक्त निर्णय घेण्यात आला.

* सर्व आमदार एकत्र असून ते १४ ऑगस्टपर्यंत एकत्रच राहतील, असे काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर सांगितले.

घोडेबाजार तेजीत – गेहलोत

* राजस्थान विधानसभेचे अधिवेशन १४ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर घोडेबाजार तेजीत असल्याचा दावा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला.

* विधानसभेच्या अधिवेशनाची घोषणा बुधवारी रात्री झाल्यानंतर घोडेबाजार वाढला. यापूर्वी पहिला हप्ता १० कोटी रुपये होता, तर दुसरा हप्ता १५ कोटी रुपये इतका होता, मात्र आता त्याला मर्यादा राहिलेली नाही आणि घोडेबाजार कोण करीत आहे ते सर्वश्रुतच आहे, असे गेहलोत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 12:02 am

Web Title: notice to rajasthan assembly speaker abn 97
Next Stories
1 जया जेटलींसह तिघांना ४ वर्षांची शिक्षा
2 काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
3 ४ किलो सोनं, ६१० किलो चांदी, ११ टीव्ही, १० फ्रिज; जयललितांची मालमत्ता ताब्यात
Just Now!
X