जवाहरलाल नेहरू व सोनिया गांधी यांच्यावर टीका करणारे लेख ‘काँग्रेस दर्शन’ या पक्षाच्या नियतकालिकात प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी मुंबई काँग्रेसचे प्रमुख संजय निरुपम यांच्याकडे काँग्रेसने स्पष्टीकरण मागितले आहे. या लेखांमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे वडील हे फॅसिस्ट सैनिक होते असे म्हटले होते.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या शिस्तभंग समितीचे प्रमुख ए. के. अँटनी यांनी निरूपम यांना या वादाबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निरुपम यांना या नोटिशीला काही दिवसात उत्तर देण्यास काही दिवसांची मुदत दिली आहे.

गुलाम नबी आझाद, सुशीलकुमार शिंदे हे शिस्तभंग समितीचे सदस्य असून मोतीलाल व्होरा हे सदस्य सचिव आहेत. काँग्रेसच्या या मुखपत्रात गेल्या महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात नेहरू यांचे काश्मीर धोरण चुकीचे होते तसेच सोनिया गांधी यांचे वडील हे फॅसिस्ट सैनिक होते असे उल्लेख होते. त्यानंतर निरुपम यांनी या प्रकरणी माफी मागितली होती व संपादन समन्वयक सुधीर जोशी यांना काढून टाकले होते.

विशेष म्हणजे पक्षाच्या १३१ व्या स्थापनादिनाच्या वेळीच हे प्रकरण सामोरे आल्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. मुंबईतील काँग्रेसचे पदाधिकारी असलेले गुरुदास कामत यांच्यासह काही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन संजय निरुपम आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. काँग्रेस स्थापनादिनी हा लेख प्रसिद्ध झाल्यावर संजय निरूपम यांनी या प्रकरणात आपली काहीही चूक नसल्याचे सांगत या प्रकरणातून अंग काढण्याचा प्रयत्न केला होता.