जयपूर : राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या कथित प्रयत्नांच्या प्रकरणात पोलिसांच्या विशेष संचालन  गटाने चौकशी सुरू केली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. सरकारचे प्रमुख अधिकारी महेश जोशी यांनाही नोटीस जारी करण्यात आली आहे.

विशेष गटाने सरकार पाडण्याच्या प्रयत्नांबाबत दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोन जण गेहलोत यांचे सरकार पाडण्यासाठीच्या घोडेबाजारात सामील असल्याचे सांगण्यात येते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान डझनभर आमदार व इतरांनाही नोटिसा जारी करण्यात येणार आहेत. चौकशीत असे  निष्पन्न झाले की, दोन ते तीन आमदार हे भाजपच्या वतीने इतर आमदारांना पैसे देऊन वळविण्यात सामील होते. त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.