हॉलीवूडमधील श्रीमंतीची वैविध्यपूर्ण रूपे जगाला आपल्या कादंबऱ्यांतून दाखविणाऱ्या सिद्धहस्त लेखिका जॅकी कॉलिन्स (७७) यांचे कर्करोगाने निधन झाले. ‘हॉलीवूड वाइव्हज’ व ‘द स्टड’ यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यांनी खपाचे उच्चांक गाठले आहेत. जगभरातील सिनेअभ्यासकांना त्यांच्या कादंबऱ्यांनी हॉलीवूडच्या भव्य पडद्यामागचे खरे जग दाखविले होते. जन्माने कॉलिन्स ब्रिटिश होत्या.
कॉलिन्स यांच्या ३२ कादंबऱ्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या खूपविक्या (बेस्ट सेलर) पुस्तकांच्या यादीत होत्या. लॉस एंजेलिसमध्ये जन्मलेल्या स्टार कलाकार पुत्रांपासून ते त्यांच्या नातेवाईकांच्या आयुष्यावर घडणारा परिणाम यांनी त्यांची वेगवान कथानके भरलेली असत. त्यांच्या पुस्तकांच्या ५० कोटी प्रती चार दशकांत चाळीस देशांत खपल्या. स्तनांच्या कर्करोगाचे निदान होऊनही त्यांनी आणखी पाच पुस्तके लिहिली होती. त्यांची ‘द सँटॅनगेलॉस’ ही ताजी कादंबरी ६०० पानांची आहे. सर्जनशील लिखाणाची प्रेरणा अनेक लेखिकांनी त्यांच्याकडून घेतली होती.
‘द वर्ल्ड इज फुल ऑफ मॅरिड मेन’ ही त्यांची पहिली कादंबरी १९६८ मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीवर ऑस्ट्रेलियात बंदी घातली गेली होती. १९८५ मध्ये त्यांची ‘हॉलीवूड वाइव्हज्’ ही कादंबरी आली. त्यावर एबीसीने संक्षिप्त मालिकाही काढली. त्यात अँथनी हॉपकिन्स व कॅनडाइस बेरगेन यांच्या भूमिका होत्या. ‘द स्टड’ ही त्यांची कादंबरी १९६९ मध्ये प्रसिद्ध झाली.