अतिउत्साही शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला असतानाच त्या प्रकाराची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशातील एका दुर्गम गावांत होत असल्याची माहिती हाती आली आहे. तेथील एका प्राचीन शिवमंदिरात चक्क गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीच्या प्रश्नावरून भाजपने दोन दशकांपूर्वी देशातील राजकारण ढवळून काढले होते, त्याच प्रभुरामचंद्रांचे निस्सीम भक्त असलेल्या हनुमान यांची ‘चालिसा’ ग्रामस्थांना माहिती आहे किंवा नाही हे स्पष्ट झाले नसले, तरी त्यांनी ‘मोदी चालिसा’ मात्र तयार केली आहे.
अलाहाबादजवळच्या कौशंबी जिल्ह्य़ातील भगवानपूर येथील ग्रामस्थांनी नरेंद्र मोदी यांना देव मानून त्यांची पूजा सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर आता मोदी यांना ‘स्वामी नरेंद्र मोदी’ असे संबोधण्यात येत आहे. प्राचीन शिवमंदिरात मोदी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून शिवमंदिराचे आता ‘नमो नमो मंदिर’ असे नामकरणही झाले आहे. भक्तगण दररोज आपल्या दैवताची पूजा करीत असून ‘मोदी चालिसा’चे पठणही केले जात आहे. इतकेच नव्हे तर मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी आता पुढील १२५ दिवस या मंदिरात भक्तगण आपल्या देवासमोर दीप प्रज्वलित ठेवणार आहेत.
शिवमंदिरातील पुजाऱ्याने यासाठी पुढाकार घेतल्याने तो टीकेचा धनी ठरला आहे. भाजपशी संबंधित असलेल्यांची ही क्लृप्ती असल्याचे म्हटले जात आहे. ब्रिजेंद्र नारायण मिश्रा असे या पुजाऱ्याचे नाव असून त्यांच्या मते मोदी यांची पूजा केल्याने देशाला उज्ज्वल भवितव्य लाभणार आहे. मोदी हेच देशाचे तारणहार असून तेच स्थैर्य आणि भरभराट आणतील असे मिश्रा यांचे म्हणणे असून त्यांची पूजा करणे हीच आपली देशभक्तीची पद्धत असल्याचे ते म्हणाले.
अल्पावधीतच या ‘नमो नमो मंदिरा’ची कीर्ती पसरत चालल्याने ते मंदिर पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. मिश्रा यांनी मोदी यांच्यासारखाच पेहराव करण्याचे ठरविले असून त्यांच्याप्रमाणेच दाढीही वाढविली आहे. मंदिरातील शिवलिंगाच्या शेजारीच मोदी यांची चार फूट उंचीची मूर्ती बसविण्यात आली आहे.

“पद्म पुरस्कारांसाठी बिहारमधून अनेकांनी अर्ज केले होत़े  परंतु, नावांच्या शिफारसी लावून धरण्यात नितीश कुमार यांचे शासन अपयशी ठरले आह़े  प्रशासनाकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही़  ही सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवरच सोपविण्यात आली होती़  त्यामुळे शासनाने पाठविलेल्या तीनपैकी एकही प्रस्ताव संमत होऊ शकला नाही़ ”   
सुशीलकुमार मोदी, भाजप नेत़े

“माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ नंदन नीलेकणी हे लवकरच दिल्लीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत़  बंगळुरू-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून नीलेकणी यांचे नाव अद्याप निश्चित केलेले नाही. मात्र त्याबाबत विचार होऊन काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि मध्यवर्ती निवडणूक समिती अंतिम निर्णय घेईल़”
जी. परमेश्वर, कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष