महाभियोग चौकशीत अधिक पुरावा मिळण्याची शक्यता

वॉशिंग्टन : अमेरिकेत अध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग चौकशीत युक्रेनच्या प्रकरणाची सगळी माहिती सांगणारा एक नवीन जागल्या सामोरा आला आहे. त्याला या प्रकरणातील सगळी माहिती असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला आहे. यामुळे आधीच्या जागल्याने दिलेल्या माहितीवर आणखी शिक्कामोर्तब होऊन ट्रम्प  यांच्या विरोधात आणखी भक्कम पुरावे मिळणार आहेत.

सध्यातरी  काँग्रेसने युक्रेन प्रकरणी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. रिपब्लिकन सदस्य यात काही बोलायला तयार नाहीत, ते अपेक्षितच आहे, पण आता दुसरा जागल्या सामोरा आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. आधीच्या जागल्याने केलेल्या तक्रारीनंतर ट्रम्प यांच्यावर महाभियोग चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

दोन्ही जागल्यांचे काम पाहणारे वकील मार्क झैद यांनी सांगितले, की नवीन जागल्या हा गुप्तचर खात्यात काम करणारा आहे, मूळ जागल्या हा सीआयएचा अधिकारी आहे. त्याने महानिरीक्षकांकडे पहिल्यांदा ऑगस्टमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात तक्रार दिली होती त्यावरून आता महाभियोग चौकशी सुरू झाली आहे.

ट्रम्प यांनी जुलैत युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदमीर झेलेनस्की यांना फोन करून त्यांच्यावर राजकीय विरोधक असलेले अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बिदेन व त्यांचा मुलगा हंटर बिदेन यांची चौकशी करण्यासाठी दबाव आणला होता. हे प्रकरण उघड झाल्यानंतर व्हाइट हाऊसने सारवासारव सुरू केली होती. आता दुसरा जागल्या (व्हिसलब्लोअर)  पुढे आला आहे, त्याला या प्रकरणातील आणखी माहिती असून ती हाती आल्यानंतर ट्रम्प व त्यांच्या पाठीराख्यांना  आरोपांमध्ये आणखी जखडून ठेवणे सोपे जाणार आहे.

राजकीय हेतूचा आरोप खोडला?

पहिल्या जागल्याने दिलेली तक्रार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप आता खोडून काढला जाणार आहे. दुय्यम व तिय्यम माहितीवर आधारित अशी पहिली तक्रार होती, असे सांगून ट्रम्प यांनी त्याला फारसे महत्त्व देण्याचे टाळले. ट्रम्प यांनी स्वत:च्या राजकीय हितासाठी युक्रेनवर बिदेन यांची चौकशी करण्यासाठी दबाव आणल्याचे त्यांनी झेलेनस्की यांना केलेल्या दूरध्वनीच्या लिखित मजकुरातून स्पष्ट झाले आहे. महाभियोग चौकशीत परराष्ट्र खात्यावर निशाणा साधण्यात आला असून कुर्त व्होल्कर यांचे जाबजबाब आधीच पार पडले आहेत. व्होल्कर हे युक्रेनमध्ये अमेरिकेचे खास दूत होते. या आठवडय़ात अमेरिकेचे युरोपीय समुदायातील दूत गॉर्डन सोंडलँड, अमेरिकेच्या युक्रेनमधील दूत मारी योव्हानोविच यांचेही जाबजबाब होणार आहेत.