भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाची पायपुसणी संकेतस्थळावरुन काढल्यानंतर आता अॅमेझॉनने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र असणाऱ्या चपलेचे छायाचित्र कंपनीच्या कॅनडामधील संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अॅमेझॉनने भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाची पायपुसणी संकेतस्थळावरुन हटवली होती. मात्र या घटनेच्या दोन दिवसांनंतर लगेचच अॅमेझॉनने राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान करणारी कृती केली आहे.

खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या दिनदर्शिकेवरून महात्मा गांधींचे चित्र काढण्यावरुन वाद सुरू असताना आता अॅमेझॉनने महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेल्या चपलांचे छायाचित्र संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. ‘गांधी फ्लिप फ्लॉप्स’ या नावाने अॅमेझॉनने या चपला विक्रीसाठी ठेवल्या असून त्यांची किंमत १६.९९ अमेरिकन डॉलर इतकी आहे. महात्मा गांधींचे छायाचित्र असलेल्या चपला विक्रीला ठेवत अॅमेझॉनने पुन्हा एकदा भारताचा अपमान केला आहे.

दोनच दिवसांपूर्वी अॅमेझॉनच्या कॅनडामधील संकेतस्थळावर भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसणीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. यावरुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. अॅमेझॉनने भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसणी संकेतस्थळावर हटवावी आणि याप्रकरणी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली होती. अॅमेझॉनने पायपुसणी संकेतस्थळावरुन न हटवल्यास आणि माफी न मागितल्यास कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याला व्हिसा देण्यात येणार नाही, अशी भूमिका स्वराज यांनी घेतली. याशिवाय सध्या भारतात असणाऱ्या अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांचा व्हिसा रद्द केला जाईल, असा इशारादेखील दिला होता. सुषमा स्वराज यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष अमित अगरवाल यांनी भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली होती. यानंतर अॅमेझॉनने भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसणीदेखील संकेतस्थळावरुन हटवली होती.