उत्तर प्रदेशातील मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय ठेवल्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारने बरेली, कानपूर आणि आग्रा विमानतळांचीही नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, राज्य नागरी उड्डाण विभागाने केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्वावात बरेली विमानतळाचे नाव ‘नाथ नगरी’ असे बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. हे या शहराचे जुने नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नाथ संप्रदायाचे अनुयायी आहेत. त्यांनी यापूर्वी गोरखपूरमधील भारतीय हवाईदलाच्या सिविल टर्मिनलचे नाव बदलून ते महायोगी गोरखनाथ यांच्या नावावरून ठेवले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे नागरी उड्डाण मंत्री नंद गोपाल नंदी म्हणाले, या तिनही विमानतळांची नावे बदलण्याची जुनी मागणी आहे. या तिनही विमानतळांची नावे बदलण्याचा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे याबाबत लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे.

तर, कानपूरमधील चकेरी विमानतळाचे नाव स्वातंत्र्य सेनानी गणेश शंकर विद्यार्थी यांच्या नावावर ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावात म्हटले आहे की, कानपूरला यापूर्वी कान्हा पूर नावाने ओळखले जायचे. त्याचबरोबर आग्रा विमानतळाचे नाव दीनदयाल उपाध्याय असे ठेवण्याचेही प्रस्तावात म्हटले आहे.