राज्यसभेतील तेलगु देसमचे चार खासदार आणि इंडियन नॅशनल लोक दलाच्या एका खासदाराला गळाला लावल्यानंतर भाजपा आता राज्यसभेतील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) दोन खासदारांवर नजर ठेऊन आहे.

भाजपाचे राज्यसभेचे सध्याचे संख्याबळ ७६ झाले असून भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) संख्याबळ ११२ वर पोहोचले आहे. बिजू जनता दल आणि अन्य मित्र पक्षांच्या पाठिंब्यामुळे भाजपने राज्यसभेत कामचलाऊ बहुमत मिळविले असले तरी राज्यसभेत पूर्ण बहुमत मिळविण्याच्या दृष्टीने भाजपा पीडीपीच्या दोन सदस्यांना गळाला लावण्याच्या बेतात आहे.

राज्यसभेत पीडीपीच्या दोन सदस्यांनी मागच्या सोमवारी केलेली भाषणे पाहता; सत्तारुढ पक्षाने त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न पुन्हा नव्याने सुरु केले केल्याचे दिसते. एकूणच या घडामोडींवरून काही तरी नक्कीच शिजत असल्याचे संकेत मिळतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या जम्मू-काश्मिरमधील राष्ट्रपती राजवटीला मुदत वाढ देण्यासंबंधीच्या ठरावावरील चर्चेप्रसंगी पीडीपीचे खासदार नजीर अहमद आणि मीर मोहम्मद फैयाज या दोघांनाही लोकसभा अध्यक्षांनी बोलण्याची विशेष परवानगी दिली. तथापि, नियमानुसार एकाच खासदाराला बोलण्याची परवानगी देता येते.

या ठरावावर बोलतांना दोघांनीही मोदी सरकारवर टीका करण्याचे टाळले. नजीर अहमद म्हणाले की, अमित शहा यांच्या काश्मीर भेटीने नवीन आशा पल्लवीत झाल्या असून ही वेळ जखमा बऱ्या करण्याची आहे. अशाच भावना मीर मोहम्मद फैयाज यांनीही व्यक्त केल्या.

या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतल्याचे समजते. जितेंद्र सिंह हे जम्मू-काश्मिरमधून लोकसभेवर निवडून आलेले आहेत. त्यांच्यात काय चर्चा झाली, हे मात्र कळले नाही. भाजपा आणि पीडीपीचे बिनसल्याने दोन वर्षापूर्वी मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार पडले. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू-काश्मीर खोऱ्यातील प्रत्येकी तीन जागा पटकावल्या आहेत.