भाजप हा दहशतवादाचे प्रतीक असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते मीम अफझल यांनी केल्याने नव्या संघर्षांला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गुजरातमधील दंगलींमुळे इंडियन मुजाहिद्दीनचा जन्म झाला, या काँग्रेसचे नेते शकील अहमद यांच्या वक्तव्यावरून राजकीय वादळ उठलेले असतानाच अफझल यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार आहे. भाजप पक्ष हा दहशतवादाचे प्रतीक आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये त्यांनी जे केले ते दहशतवादापेक्षा कमी नव्हते, अशी टीका त्यांनी केली. अहमद यांनी केलेल्या वक्तव्यावरून उठलेल्या राजकीय वादळाबाबत अफझल यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
निष्पाप लोकांची हत्या करणे आणि त्यांना हानी पोहोचविणे यापेक्षा दहशतवाद वेगळा नाही, त्यामुळे भाजपने जे काही केले आहे त्यापेक्षा आपण वेगळे काही सांगत नाही, मीडियाही तेच म्हणते, असे अफझल म्हणाले. गुजरातमध्ये २००२ मध्ये उसळलेल्या दंगली म्हणजे राज्य सरकारपुरस्कृत दहशतवाद होता, असा दावाही त्यांनी केला. शकील अहमद यांनी आपले वैयक्तिक मत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे, असेही अफझल यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 24, 2013 12:57 pm