देशातील नागरिक आणि तंत्रप्रिय व्यक्तींच्या सहभागाने पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) अॅप तयार केले जावे या संकल्पनेतून सुरू असलेली अॅप निर्मितीची स्पर्धा तिच्या दुसऱया टप्प्यात येऊन पोहोचली आहे. स्पर्धकांना या टप्प्यात अॅपचे पायाभूत रुप कसे असावे याचे डिझाईन तयार करून पाठवावे लागणार आहे. स्पर्धकांनी तयार केलेल डिझाईन mygove.in या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात पाठवावे लागणार आहे. यासाठीची अंतिम मुदत १२ जूनपर्यंत असणार आहे.
मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्पर्धेची घोषणा केली होती. जनतेच्या सहभागातून पंतप्रधान कार्यालयाचे महत्त्वाकांक्षी अॅप डिझाईन केले जावे या संकल्पनेतून अॅपसाठी स्पर्धेचे आयोजन केले गेले. स्पर्धेसाठी इंटरनेटच्या महाजालातील गुगल या सर्च इंजिन कंपनीचीही मदत घेतली गेली. विशेष म्हणजे, विजेत्या स्पर्धकाला गुगलच्या अमेरिकेतील मुख्यालयाला भेट देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात एकूण ९,००० प्रवेशिका आल्या होत्या.
स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मिळालेल्या प्रतिक्रियांतून अॅपचे ब्लू प्रिंट तयार करण्यात आले असून दुसऱया टप्प्यात स्पर्धकांना आपल्या डिझाईन्स पाठवता येणार आहेत. अॅप कसे दिसावे, तीत कोणती गोष्ट कुठे असावी, किती सेक्शन असावेत अशा विविध मुद्द्यांचा सारासार विचार करून स्पर्धकांनी १२ जूनच्या आत आपले डिझाईन पाठवणे अपेक्षित आहे.