22 November 2017

News Flash

टॅबलेट पीसीमध्ये ‘कागद क्रांती’

टॅबलेट पीसी आवाक्यात येणाऱ्या किंमतीत मिळत असले, तरी त्याचा नाजूकपणा हाताळणाऱ्याच्या भीषण चिंतेचा विषय

पीटीआय,लंडन | Updated: January 9, 2013 3:57 AM

*इ-बुक वाचण्यास उपयोगी * अनेक फाइल्स एकावेळी हाताळणे शक्य * फुटण्याची भीती नाही
टॅबलेट पीसी आवाक्यात येणाऱ्या किंमतीत मिळत असले, तरी त्याचा नाजूकपणा हाताळणाऱ्याच्या भीषण चिंतेचा विषय असतो. मात्र येत्या काही वर्षांमध्ये टॅब वापरकर्त्यांच्या या चिंतेचा मागमूसही उरणार नाही. कारण टॅबमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्क्रीनचे स्वरूप येत्या पाच वर्षांत बदलणार असून हा स्क्रीन कागदाइतका पातळ असेल तो चुरगळला तरी त्याला काही होणार नाही, पडून फुटण्याचीही भीती नाही. थोडक्यात  कागदाच्या जाडीचे पेपरटॅब बघायला मिळणार आहेत.
काय आहे कागद क्रांती?
कॅनडातील क्वीन्स विद्यापीठाने प्लास्टिक लॉजिक व इंटेल लॅब्ज यांच्या सहकार्याने हे संशोधन केले आहे. त्यातून कागदासारखे सडपातळ व ‘अनब्रेकेबल’ अशी साधने निर्माण करता येणार आहेत. पेपर टॅब हा लवचीक तसेच आंतरक्रियांना अनुकूल असणार आहे. त्याचा प्लास्टिकचा पडदा हा १०.७ इंचांचा असेल व त्यावर आपण अधिक स्पष्टपणे माहिती किंवा छायाचित्रे बघू शकू. हा लवचिक पडदा प्लास्टिक लॉजिक या कंपनीने तयार केला आहे व या पेपरटॅबमध्ये इंटेलकोअर टीएम आय ५ संस्कारक वापरला आहे.
कशी घडेल ही क्रांती?
लास वेगास येथील इलेक्ट्रॉनिक मेळ्यात या प्रकारचा स्क्रीन सादर केला जाणार असून केवळ कागदासारखा पडदा असलेला नवीन डेस्कटॉप ही संकल्पना मांडली जाणार आहे. यात दहा किंवा जास्त प्रकारचे आंतरक्रियात्मक डिस्प्ले म्हणजे पडदे असणार आहेत एका पडद्यावर अनेक अ‍ॅपस किंवा खिडक्या दिसतील, हा प्रत्येक पडदा म्हणजे पेपरटॅब असेल. त्यांचा वापर इ-बुकसारखा करता येईल.

फायदा काय होणार?
तुम्हाला एका पेपरटॅबवर फोटो दिसेल दुसऱ्यावर इमेल दिसेल नंतर आपोआप फोटो इमेलला जोडला जाईल. हा इमेल पेपरटॅब आउट ट्रेमध्ये ठेवून पाठवला जाईल किंवा पेपरटॅबचा कोपरा किंचित वाकवला तरी इमेल पाठवला जाईल. मोठे चित्र किंवा प्रदर्शनीय पृष्ठभाग अनेक पेपरटॅब एकापुढे एक ठेवून तयार करता येईल. येत्या पाच ते दहा वर्षांत बहुतेक संगणक अगदी अल्ट्राबुकपासून टॅबलेटपर्यंत या स्क्रीन्सचा वापर करतील व छापील रंगीत कागदासारखे ते दिसतील.

First Published on January 9, 2013 3:57 am

Web Title: now flexible paper tablet that can be twisted and dropped
टॅग Paper Tablet