भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या तुघलकी धोरणामुळे काश्मीरमध्ये मुक्ती संग्राम सुरु होईल या आशयाचं ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्याने पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. भारताला धडा शिकवण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य इम्रान खान यांनी बुधवारी केलं होतं. त्यापाठोपाठ आता पुन्हा एकदा काश्मीरमध्ये मुक्ती संग्राम सुरु होईल असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

एवढंच नाही आजही इम्रान खान यांनी त्यांच्या ट्विट्समधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये तुम्ही लष्कर तैनात केलं आहे. मात्र कोणतंही लष्कर क्रांती रोखू शकत नाही अशा आशयाचं ट्विटही इम्रान खान यांनी केलं आहे. काश्मीरमध्ये हुकुमशाही आणायची आहे त्याचमुळे अशा प्रकारची पावलं भारताकडून उचलली जात आहेत असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

भारताला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आमचं लष्कर तयार आहे अशी धमकी इम्रान खान यांनी परवाच दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये इम्रान खान यांनी १४ ऑगस्टला हजेरी लावली होती. त्यावेळी इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघावर निशाणा साधला आहे. संघ हा हिटलरच्या विचारसरणीवर तयार झाला आहे. हिंदू राष्ट्र, हिंदू धर्म सर्वोच्च आणि बाकी सगळे धर्म तुच्छ ही संघाची धारणा आहे. हीच त्यांची विचारधारा आहे. ही विचारधारा भारतासाठी घातक ठरणारी आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा काश्मीरची बाजू घेणारे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे ट्विट त्यांनी केले आहेत.