प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून आता ‘वेक-अप अलार्म कॉल’ आणि ‘डेस्टिनेशन अलार्म कॉल’ या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. अत्यंत कमी दरात सुरू करण्यात आलेल्या या दोन सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय कमी होण्याची शक्यता आहे. ट्रेनने अनोळखी ठिकाणी प्रवास करताना आपल्याला अनेकदा ज्या स्थानकावर उतरायचे आहे, ते स्थानक निघून जाईल, अशी भीती सतावत असते. त्यासाठीच रेल्वेतर्फे ‘वेक-अप अलार्म’ ही सुविधा सुरू करण्यात आली असून या सुविधेअंतर्गत प्रवाशांना इच्छित स्थानक येण्याच्या अर्धा तास आधी रेल्वेकडून कळविले जाईल. जेणेकरून, प्रवाशांना तासनतास खिडकीतून बाहेर डोकावत आपले स्थानक आले की नाही याची वाट पहावी लागणार नाही. या सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी प्रवाशांना १३९ क्रमांकावर चौकशी करण्याचा किंवा व्हॉईस कॉलचा पर्याय निवडावा लागेल. व्हॉईस कॉलच्या पर्यायामध्ये प्रवाशांना त्यांचा पीएनआर क्रमांक, स्थानकाचा एसटीडी कोड आणि सुचीत दिल्याप्रमाणे स्थानकाच्या क्रमांकाची माहिती द्यावी लागेल.
याशिवाय, प्रवासाला निघण्याआधी प्रवाशांना त्यांची गाडी स्थानकात नेमकी कधी येईल, हे अर्धा तास अगोदर फोन करून कळविण्याची व्यवस्था ‘डेस्टिनेशन अलार्म कॉल’ या सुविधेमार्फत करून देण्यात आली आहे. या सुविधेसाठी गाडीचे नेमके ठिकाण लक्षात घेऊनच प्रवाशांना कळवले जाईल. जेणेकरून, काही कारणास्तव गाडीला उशीर झाल्यास प्रवाशांना गाडीच्या स्थानकात येण्याची नेमकी वेळ कळु शकेल. १३९ या चौकशी क्रमांकावर फोन करून किंवा लघुसंदेश पाठवून प्रवासी ‘डेस्टिनेशन अलार्म कॉल’ सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
आयआरसीटीसी आणि भारत बीपीओ यांनी संयुक्तपणे हा उपक्रम सुरू केला असून, १३९ क्रमांकावर शहरी भागातून येणाऱ्या कॉल्ससाठी १.३९ रूपये आणि अन्य भागातील कॉल्ससाठी २ रूपयांचे शुल्क आकारले जाईल. तर लघुसंदेश सेवेसाठी प्रत्येकी ३ रूपये आकारले जातील.