कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपा आणि काँग्रेस एकमेकांची उणीदुणी काढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नुकतेच १५ मिनिटे कागद समोर न ठेवता भाषण करुन दाखवण्याचे आव्हान दिले होते. यावरुन आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदींवर पलटवार केला असून त्यांना खुले आव्हान दिले आहे. मोदींनी केवळ १५ मिनिटांत कागदावर पाहून मागील येडीयुरप्पा सरकारची कामगिरी सांगावी असे त्यांनी मोदींना सांगितले आहे. ते चामराजनगर येथील निवडणूक रॅलीदरम्यान बोलत होते. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

मोदींनी राहुल गांधी यांच्याबरोबरच सिद्धरामय्या यांना देखील आपल्या प्रचारसभेत टार्गेट केले होते. सिद्धरामय्या यांना प्रचारादरम्यान व्यासपीठावर झोप लागली होती, त्यावरुन मोदींनी त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र, मोदींच्या या टिप्पणीला सिद्दरामय्या यांनी उत्तर दिले असून ते म्हणाले, पंतप्रधान विनाकारण अनावश्यक मुद्द्यांकडे लक्ष केंद्रीत करतात. आपल्याला ‘स्लीप एपनिया’ची समस्या असून त्यामुळे बऱ्याचदा दिवसा आपल्याला झोप लागते, यावर मी उपचारही घेत आहे. मात्र, मोदींनी माझ्या या समस्येवर अशा प्रकारे बोलण्याची गरज नव्हती. अशा टिप्पण्या करून मोदी एखाद्या ट्रोलरप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हारण्याच्या भितीने सिद्धरामय्या यांनी आपला मतदारसंघ बदलला असून ते दोन ठिकाणांहून निवडणूक लढवित आहेत. आपला जुना मतदारसंघ त्यांनी आपल्या मुलासाठी सोडला आहे. हे कर्नाटकच्या झोपा काढणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे संशोधन असल्याची टीका मोदींनी केली होती. सिद्धरामय्या यावेळी चामुंडेश्वरी आणि बादामी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. तर त्यांचा मुलगा वरुणा येथून निवडणूक लढवित आहे.

दरम्यान, सिद्दऱामय्या यांनी ट्विट करुन मोदींवर हल्लाबोल करीत काही सवाल उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, मोदी जनार्दन रेड्डींच्या नेतृत्वाखालील खाण माफियांचे समर्थन का करीत आहेत? महादायी वाद सोडवायला ते आमची मदत का करीत नाहीएत? बँकांचे २.७१ लाख कोटींची कर्जे माफ केली जात आहेत मात्र, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे पॅकेज का जाहीर करीत नाहीत? पेट्रोलच्या किंमती सातत्याने का वाढत आहेत? त्याचबरोबर सिद्धरामय्या यांनी राफेल विमान खरेदी घोटाळा आणि पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावरही प्रश्न उपस्थित केले.

कर्नाटकात १२ मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूका होत आहेत. तर १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त जनता दल युनायटेड येथे तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे.