एरवी आपण झुरळाला घाबरतो पण तेच झुरळ तुमच्या स्मार्टफोनने केलेल्या नियंत्रणाप्रमाणे हालचाली करू लागले तर.. ही कल्पना वैज्ञानिकांनी प्रत्यक्षात आणली असून झुरळालाच सायबोर्ग केले आहे. झुरळाच्या शरीरात एक चिप टाकून त्याचे नियंत्रण करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. या मानव नियंत्रित झुरळ बनवण्याच्या प्रकल्पाचे नाव रोबोरोच असे असून बॅकयार्ड ब्रेन्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिशिगनमधील अ‍ॅन अरबोर येथील शिक्षण संशोधकांनी ते तयार केले आहे.
रोबोरोच प्रकल्पात तीन घटक आहेत एक म्हणजे शस्त्रक्रिया करून इलेक्ट्रिक सिम्युलेटर बसवलेले झुरळ, झुरळाच्या आकाराचा बॅकपॅक ज्याच्यातून संदेश स्मार्टफोनपर्यंत जातो व असे एक उपकरण ज्याच्या मदतीने झुरळाला आदेश देता येतील.
झुरळे ही आजूबाजूच्या भागाचा अंदाज हा त्यांच्या डोक्यावर असलेल्या दोन लांबलचक केसांसारख्या अँटेनामुळे घेत असतात. जेव्हा या अँटेनाचा स्पर्श एखाद्या पदार्थाला होतो तेव्हा त्यांच्यातील न्यूरॉन मेंदूकडे विद्युत संदेश पाठवतात त्यामुळे मधे अडथळा आहे हे झुरळाला समजते. झुरळाची दिशा नियंत्रित करण्यासाठी याचाच वापर करून घेतला आहे.
संशोधकांनी झुरळाच्या अँटेनात एक इलेक्ट्रिक सिम्युलेटर बसवला त्यात झुरळाचा एक पाय काढून टाकला जातो. त्यानंतर झुरळाच्या पाठीवर एक बॅकपॅक बसवला जातो तो कंट्रोल इंटरफेसने सिम्युलेटरला जोडतात, या ठिकाणी स्मार्टफोन हा कंट्रोल इंटरफेस आहे. त्यानंतर वापरकर्ता व्यक्ती झुरळाला कसे फिरवायचे ते नियंत्रण हातात घेते. स्क्रीनवर अंगठा डावीकडे किंवा उजवीकडे फिरवून ते केले जाते. स्क्रीनला स्पर्श करताच झुरळाच्या अँटेनाला विद्युत संदेश जातो त्यामुळे त्याला अडथळा आला आहे असे वाटते. त्यामुळे ते दिशा बदलते.