पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जन्मठिकाण असणारे वडनगर आणि मोदी बालपणी स्टॉलवर चहा विकत असत ते रेल्वे स्थानक ही दोन्ही ठिकाणे आता गुजरातमधील पर्यटन पॅकेजेसचा अधिकृत भाग झाली आहेत. गुजरात पर्यटन महामंडळाशी संलग्न असणाऱ्या एका संस्थेतर्फे ६०० रूपयांत हे पॅकेज पर्यटकांना देण्यात येत आहे. या पॅकेजतंर्गत दिवसभरात पर्यटकांना मेहसाणा जिल्ह्यात असणारे वडनगर आणि बालवयात मोदी चहाविक्री करत असलेल्या स्थानिक रेल्वेस्थानकासह मोदींशी संबंधित अन्य ठिकाणांची सैर घडविली जात आहे.
गुजरात पर्यटन महामंडळाशी संलग्न असलेल्या अक्षर ट्रॅव्हल्सतर्फे ‘अ राईज फ्रॉम मोदीज व्हिलेज’ हे पॅकेज पर्यटकांसमोर ठेवण्यात आले असून, आतापर्यंत या पॅकेजला तुफान प्रतिसाद मिळाल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. जानेवारी महिन्यातील ‘व्हायब्रंट गुजरात’ परिषदेच्यादरम्यान हे पॅकेज सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून पर्यटकांकडून पॅकेजला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे टुर ऑपरेटर्सचे म्हणणे आहे. अहमदाबाद आणि गांधीनगर ते वडनगरपर्यंतच्या या प्रवासात पर्यटकांना नरेंद्र मोदींचा जन्म झाले ते वडिलोपार्जित घर, त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतली ती प्राथमिक कुमार शाळा ही ठिकाणे दाखविली जातात. याशिवाय, मोदींनी ज्या उच्च माध्यमिक शाळेत असताना नाटकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या, ती शाळाही पर्यटकांना बघायला मिळणार आहे. या पॅकेजचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोदींचे शिक्षक आणि त्यांचे वर्गमित्र यांच्याकडून पर्यटकांना मोदींच्या बालपणीच्या काही दुर्मिळ गोष्टीही ऐकायला मिळतील. तसेच बालपणी मोदी आरतीच्यावेळी ढोल वाजवत ते हटकेश्वर मंदिर आणि नरेंद्र मोदी मित्रांबरोबर खेळताना मगरीची पिल्ले पकडत तो शर्मिष्ठा तलावही पर्यटकांना पहायला मिळणार असल्याची माहिती अक्षर ट्रॅव्हल्सचे टूर व्यवस्थापक पंकज चौधरी यांनी दिली.

दरम्यान, अक्षय ट्रॅव्हल्सच्या वेबसाईटवर सर्वात अविस्मरणीय ठिकाण म्हणून वडनगर रेल्वेस्थानकाचा उल्लेख करण्यात आला आहे. देशातील उच्चपदावर असलेली व्यक्ती किती साध्या पार्श्वभूमीतून आलेली आहे, हे कळण्यासाठी हे ठिकाण महत्त्वाचे असल्याचे वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक आठवड्यातून एकदा आयोजित करण्यात येणाऱ्या या टुरसाठी ५६ लोकांची क्षमता असणारी बस ठेवण्यात आली आहे. मात्र, बहुतेकदा लोकांच्या मोठ्याप्रमाणावरील प्रतिसादामुळे आणखी एक बस वाढवावी लागत असल्याचे, टुर ऑपरेटर्स सांगतात.