करोनाचा अंधार दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील नागरिकांनी रविवारी रात्री नऊ वाजता दिवे पेटवले. यामध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्यापर्यंत सर्वांनी आपला सहभाग नोंदवला. अगदी देशातील सैनिकांपासून ते उद्योगपती रतन टाटांपर्यंत आणि कोच्चीमधील चर्चपासून आणि मुंबईतील दादर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत अनेकांनी दिवे लावून एकतेचा संदेश दिला. मुंबईमधील चाळींपासून ते सोसायट्यांपर्यंत आणि ग्रामीण भागापासून ते भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला.

दिवे लावण्याबरोबरच अनेक ठिकाणी लोकांना भारत माता की जय, वंदे मातरम् यासारख्या देशभक्तीपर घोषणाही दिल्या. काही ठिकाणी शुभंकरोती कल्याणम् सारखी गाणी लावण्यात आली होती. अनेक ठिकाणी लोकांनी बाल्कन्यांमधून ‘गो करोना गो…’च्या घोषणाही दिल्या. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यासंदर्भात आता आपले मत व्यक्त केलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आठवले यांनी आपण दिलेली घोषणा आता जगभरात दिली जात असल्याचे मत नोंदवलं आहे. “२० फेब्रुवारी रोजी जेव्हा देशामध्ये करोनाचा जास्त प्रादुर्भाव झाला नव्हता तेव्ही मी ‘गो करोना करोना गो’चा नारा दिला होता. त्यावेळेस अशा घोषणांनी करोना जाणार आहे का असा सवाल लोकांनी उपस्थित केला होता. मात्र आता जगभरामध्ये ही घोषणा दिली जात आहे,” असं आठवले यांनी म्हटलं आहे.

२२ मार्च रोजी जनता कर्फ्यूच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता थाळीनाद करतानाही अनेकांनी गो करोना गोच्या घोषणा दिल्या होत्या.

गो करोना नक्की आहे तरी काय?

मुंबईमध्ये करोनासंदर्भातील जनजागृतीसाठी काही चीनी नागरिकांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात एक छोट्या जनजागृतीफेरीचं आयोजन केलं होतं. यावेळेस अनेक कार्यकर्ते बॅनर घेऊन उभे होते. या कार्यकर्त्यांची आठवले यांनी भेट घेतली. हे परदेशी नागरिक मूळचे चीनचे असल्याने त्यांनी भारत चीन संबंध या संकटात अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त केला होता. चीनचे भारतातील काऊन्सील जनरल तांग गुइलाई हेही यावेळेस उपस्थित होते. आठवले आंदोलनाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी भारत चीन संबंध सुदृढ राहोत असं म्हटलं आणि ‘गो करोना… गो… गो करोना… गो’ अशा घोषणा देऊ लागले. आठवले यांना घोषणा देताना बघून उपस्थितांनाही हुरूप आला आणि परदेशी नागरिकांनीही ‘गो करोना’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. अनेकांनी यावरुन आठवलेंना ट्रोल केलं होतं.

ट्रोलर्सला तेव्हा आठवलेंनी दिलं होतं उत्तर

‘गो करोना… गो… गो करोना… गो’चा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आठवलेंना ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी या व्हिडिओवरुन तुमच्यावर टीका होत आहे यासंदर्भात आठवलेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी ट्रोलर्सचा समाचार घेतला होता. “गो कोरोना नाही, तर मग काय कम कोरोना म्हणू का?”, असा सवाल उपस्थित करत आठवलेंनी घोषणाबाजीचं समर्थन केलं आहे. “एवढा गंभीर आजार देशात दाखल झाला असताना कोरोना गो नाही, तर मग काय कोरोना या असं म्हणणार आहे का? कोरोना कम असं मी कधीच म्हणणार नाही. कोरोना गो असंच मी म्हणेल. यावरुन टीका करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. माझ्यावर टीका करणाऱ्या कोणावरही मी टीका करणार नाही. कोरोना गो म्हणजे कोरोनाने येथून जावं अशी माझी भूमिका आहे. कोरोनाने येथे येऊ नये आणि आला असेल तर येथून जावं, अशी प्रतिकात्मक भूमिका मी घेतली आहे,” असं मत आठवलेंनी नोंदवलं होतं.