तुमची छबी चॉकलेटमध्ये बनवायची असेल, तर ते शक्य आहे आता एक नवीन त्रिमिती मुद्रक म्हणजे प्रिंटर विकसित करण्यात आला आहे. तो जगातील पहिला त्रिमिती चॉकलेट प्रिंटर आहे.
 एक्सेटर विद्यापीठातील मुख्य संशोधक डॉ.लियांग हाव यांनी त्रिमिती चॉकलेट प्रिंटरची चॉक एज कंपनी स्थापन केली आहे.या प्रिंटरच्या मदतीने वापरकर्त्यांला त्याच्या चेहऱ्याची त्रिमिती प्रतिमा चॉकलेटमध्ये बनवता येईल. त्यात प्रिंटिंग हेड हे सजावटीच्या चॉकलेट मिश्रणाने भरता येतील. किमान १५-३० मिनिटे घेऊन हा प्रिंटर अतिशय आकर्षक पद्धतीने चॉकलेटवर तुमची त्रिमिती प्रतिमा छापून देतो. या यंत्रामुळे ०.५ मि.मी ते १.५ मि.मी इतक्या पातळीवर चॉकलेटच्या रेषा आखता येतात. चॉकलेटचे थर केक किंवा बिस्किटवर तयार करता येतात. त्याच्या मदतीने विविध आकार, डिझाइन, लोगो काढता येतात. त्यामुळे काही कंपन्या पुढे तुम्हाला तुमच्याच चेहऱ्याची त्रिमिती प्रतिमा भेट देऊन नवे मार्केटिंग तंत्र अवंलबू शकतील. कारण ग्राहकाच्या चेहऱ्याचा त्रिमिती चॉकलेटी पुतळा ही त्याला अनोखी भेट असू शकेल.  हा प्रिंटर जगभरात उपलब्ध केला जाणार आहे.
 हा चॉकलेट प्रिंटर तुम्ही २८८५ पौंडांना विकत घेऊ शकता किंवा तुम्ही तुमचे छायाचित्र चॉक एज कंपनीला पाठवले तर तुमच्या चेहऱ्याचा त्रिमिती पुतळाच तुम्हाला करून मिळेल अर्थातच तो चॉकलेटचा असेल व त्यासाठी तुम्हाला ८० पौंड मोजावे लागतील. त्यामुळे आता हौशी चॉकलेट हिरोंची संख्याही वाढणार आहे.
 चॉकलेटच्या रूपातील तुमच्या प्रिय व्यक्तीची प्रतिमा तुम्ही त्या व्यक्तीला भेट देऊ शकता असाही या तंत्रज्ञानाचा उपयोग आहे. समजा हा प्रिंटर तुम्ही विकत घेतला तर संगणकाच्या युएसबीला जोडून आकर्षक अशा चॉकलेट सजावटी डाऊनलोड करू शकता. तुमची छबी डाऊनलोड करून अगदी हुबेहूब तुमच्या चेहऱ्याचा त्रिमिती पुतळा चॉकलेटच्या माध्यमातून तयार करू शकता.